ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबनं घोषणा केली, की ते यासाठी गुगलच्या इन-हाऊस एरिया 120 इनक्यूबेटरचं उत्पादन अलाउड (Aloud) वापरेल. व्हिडकॉन 2023मध्ये (Vidcon 2023) याविषयीची घोषणा करण्यात आली. भाषेच्या विकल्पामुळे कंटेंट क्रिएटर्सना तर फायदा होणार आहेच. मात्र त्यासोबतच यूझर्सनादेखील फायदा होणार आहे. क्रिएटरला या माध्यमातून अधिकाधिक यूझर्सपर्यंत पोहोचता येणार आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
यूट्यूब घेणार गुगलची मदत
अलाउड हे गुगलचं एक प्रॉडक्ट आहे. मागच्या वर्षी गुगलनं हे प्रॉडक्ट लॉन्च केलं. हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित डबिंग फीचर असलेलं उत्पादन आहे. हे स्वयंचलितपणे व्हिडिओ ट्रान्सक्राइब करण्याची क्षमता ठेवतं आणि त्याचं डब व्हर्जन तयार करू शकतं. डब जनरेट करण्यापूर्वी ट्रान्सक्रिप्शनचा रिव्ह्यू आणि एडिटिंग करण्याचा पर्यायदेखील दिला जातो. आतापर्यंत कंटेंट क्रिएटर्सना विविध भाषांमधले व्हिडिओ तयार करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सवर अवलंबून राहावं लागत होतं. आता क्रिएटर्सचं काम अजून सोपं होणार आहे.
कंपनीला काय म्हणायचे आहे?
ऑडिओ ट्रॅक बदलण्यासाठी फक्त गीअर आयकॉनवर क्लिक करावं लागेल. ऑडिओ ट्रॅकवर टॅप करावं आणि तुम्हाला ज्या भाषेत व्हिडिओ ऐकायचा आहे ती भाषा निवडाली लागणार आहे. अलाउड सध्या इंग्रजी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध आहे. येत्या काळात हिंदी आणि बहासा इंडोनेशियन यासारख्या आणखी भाषा जोडण्याची कंपनीची योजना आहे.
क्रिएटर्सकडून टूलची टेस्टिंग
यूट्यूब क्रिएटर प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष अमजद हनिफ यांच्या मते, शेकडो क्रिएटर्सनी या टूलची टेस्टिंग सुरू केली आहे. लवकरच हा पर्याय प्रत्येकासाठी उपलब्ध होणार आहे. मागच्या आठवड्यात यूट्यूबनं काही अँड्रॉइड आणि गुगल टीव्ही यूझर्ससाठी '1080p प्रीमियम' पर्याय आणला.
क्रिएटर्सना फायदा
कोणताही व्हिडिओ जो क्रिएटरकडून तयार केला जातो, त्याला अधिकाधिक व्ह्यूज मिळावे, अशी क्रिएटर्सची अपेक्षा असते. त्यासाठी कंटेंटमध्ये व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न क्रिएटर्स करत असतात. मात्र कधीकधी भाषेच्या मर्यादेमुळे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचत नाही. ही अडचण आता दूर होणार आहे. अद्याप हे फीचर सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र हे फीचर फायद्याचं आहे. व्हिडिओजना क्लिक, व्ह्यूज वाढणार असल्यामुळे इन्कमवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.