केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता तेजस ट्रेनने मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ही सवलत त्यांना त्यांच्या अधिकृत कार्यालयीन दौऱ्यावर लागू असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी (दि.12 सप्टेंबर) याबाबतची एक सूचना प्रसिद्ध केली. तेजस-राजधानी एक्सप्रेस ही एक सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. जी भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, कार्यालयीन कामाकाजासाठी तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्यास मान्यता देण्याचा विचार करत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तेजस एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करण्यास परवागनी देण्याचा निर्णय घेतला. तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी शताब्दी एक्सप्रेससाठी जी नियमावली आहे; तीच नियमावली तेजस एक्सप्रेससाठी असणार आहे.
प्रवास करण्यासाठी कोणाला मिळणार परवानगी!
- केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्राकानुसार सरकारी कर्मचारी तेजस एक्सप्रेसने प्रवास करू शकतात. पण विभागाने यासाठी खालीलप्रमाणे नियम घालून दिले आहेत.
- सरकारी कर्मचारी कार्यालयीन कामकाजानिमित्त दौऱ्यावर जाणार असतील.
- कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी या ट्रेनने प्रवास करू शकतात.
- ज्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे किंवा नवीन ठिकाणी कामावर रूजू होण्यासाठी प्रवास करू शकतात.
- जर एखादा कर्मचारी निवृत्त झाला असेल आणि त्याला त्याच्या मूळ राहण्याची ठिकाणी जायचे असेल तर तो या ट्रेनने प्रवास करू शकतो.
ट्रेनला उशिरा झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई!
तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भरपाई देण्याची सुविधा उपलब्ध आहे. जर तेजस एक्सप्रेस तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहचत असेल तर रेल्वेकडून प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याची सुविधा आहे. नियमानुसार तेजस एक्सप्रेसला 1 तास उशीर झाला तर प्रवाशांना 100 रुपये आणि 2 तासांपेक्षा अधिक उशीर झाला तर प्रवाशांना 250 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. तेजस एक्सप्रेस 20 ऑक्टोबर, 2019 मध्ये पहिल्यांदा लेट झाली होती. ते लखनऊवरून दिल्लीला जात होती.
तेजस एक्सप्रेस खाजगी ट्रेन!
तेजस एक्सप्रेसची सुरूवात 24 मे, 2017 रोजी झाली होती. या एक्सप्रेसची पहिली फेरी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (Mumbai) ते करमाळी, गोवा (karmali Goa) यादरम्यान चालली होती. त्यानंतर तेजस एक्सप्रेस देशातील पहिली खाजगी ट्रेन म्हणून 4 ऑक्टोबर, 2019 रोजी धावली होती. या गाडीच्या तिकीटांच्या किमती खाली-वर होत असतात. कोरोना काळात ही ट्रेन बरेच दिवस बंद होती. त्यानंतर ऑक्टोबर, 2020 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली होती.