1 जुलै पासून अमरनाथ यात्रा सुरु होत आहे. देशभरातील शिवभक्त अमरनाथ येथील शिवमंदिराला दर्शनासाठी भेट देत असतात. तब्बल 62 दिवस चालणारी ही यात्रा अद्भुत आनंद आणि मनःशांती देणारी असते. दरवर्षी लाखो लोक या यात्रेत सहभागी होत असतात. नुकत्याच श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड (एसएएसबी) या तेथील स्थानिक व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार 3 लाख भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली आहे.
अशातच अमरनाथला जाण्याच्या बेतात असलेल्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी आगाऊ हॉटेल बुकिंग केल्यास त्यांना सवलत दिली जाईल असे ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉजेस असोसिएशनने (AJHLA) जाहीर केले आहे.
यात्रेकरूंना मिळणार 30 टक्के सूट
यात्रेकरूंची अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करण्याची लगबग सुरु झाली आहे. येत्या 1 जुलै पासून ही यात्रा सुरु होणार आहे आणि 31 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होईल. या दरम्यान भाविकांना त्यांच्या राहण्याची सोय करावी लागते. यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांनी जम्मूमधील मुक्कामासाठी आगाऊ हॉटेल बुक केल्यास त्यांना बुकिंगवर 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉजेस असोसिएशनने (AJHLA) जाहीर केला आहे. याचा मोठा फायदा भाविकांना घेता येणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांना होईल मदत
अमरनाथ यात्रा ही केदारनाथ यात्रेसारखीच साहसी देवदर्शन यात्रा आहे. या यात्रेसाठी भाविकांनी भरपूर काळजी घेणे अपेक्षित असते. जम्मू काश्मीर प्रशासन आणि श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड (एसएएसबी) यांनी याबाबत एक सविस्तर नियमावली बनवलेली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भाविकांना ती वाचता येणार आहे.
1 जुलैपासून सुरू होणाऱ्या या 62 दिवसांच्या यात्रेचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अनंतनाग जिल्ह्यातील 48 किमी लांबीचा नुनवान-पहलगाम हा मार्ग आणि दुसरा म्हणजे गांदरबल जिल्ह्यातील 14 किमी लांबीचा लहान पण दुर्गम असा बालटाल मार्ग. या दोन्ही मार्गावर भाविकांची राहण्याची, खाण्याची सुविधा देणारी शेकडो हॉटेल्स आहेत.
यात्रेसाठी भाविक जेव्हा मोठ्या संख्येने येतात तेव्हा या हॉटेल व्यावसायिकांचा धंदा जोरात चालतो. गेली काही वर्षे जम्मू-काश्मीरसाठी तणावपूर्ण होती. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला आहे. त्यांनतर उद्भवलेली परिस्थिती आणि कोविडचा कहर, यामुळे इथले पर्यटन मंदावले होते. आता अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा इथल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            