AI Impact on IT: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. जी कामे एकसारख्या पद्धतीनं दररोज करावी लागतात, रटाळवाणी आहेत, अशी कामे मशीन सहजतेनं करू शकते. त्यामुळे विविध AI ऑटोमेशन टुल्स प्रत्येक क्षेत्रात येत आहेत. आरोग्य, रिअल इस्टेट, सेवा, वाहतूक, टेलिकॉमसह प्रत्येक क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, जनरेटिव्ह AI च्या वापरामुळे भारतातील आयटी कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
भारतात आयटी कर्मचारी किती?
UnearthInsight या आयटी मार्केटिंग इंटेलिजन्स संस्थेने याबाबत अभ्यास केला आहे. भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने 90 च्या दशकात पाय रोवले. तेव्हापासून या क्षेत्राची वाढ होत आहे. भारताची एकूण आयटी इंडस्ट्री 245 बिलियन डॉलरची आहे. सध्या भारतात 55 लाखांपेक्षा जास्त IT कर्मचारी आहेत. तसेच आयटी संबंधित इतर सेवा पुरवणारेही लाखो कर्मचारी आहेत. 55 लाखांपैकी 1 टक्का म्हणजेच सुमारे 55,000 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या पुढील तीन ते पाच वर्षात जाऊ शकतात. जसा एआयचा वापर वाढेल तसे नोकऱ्या जाण्याचे प्रमाणही वाढू शकते. मात्र, त्यासोबतच नव्या संधीही निर्माण होतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.
आयटी सेल्स आणि सपोर्टवर सर्वाधिक परिणाम
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात थेट सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांबरोबरच सेल्स आणि सपोर्ट सेवा देणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. ही कामे आऊटसोर्सिंग पद्धतीने मोठ्या प्रमाणात केली जातात. टेक सपोर्ट आणि सर्व्हिस क्षेत्रात सुमारे 3 लाख कर्मचारी आहेत. पुढील तीन ते पाच वर्षात या विभागातील 50 ते 60 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना कौशल्य विकसित करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तसेच या विभागात AI टुल्सचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवे तंत्रज्ञान शिकावे लागेल.

AI मुळे कोणत्या नोकऱ्या वाढू शकतील?
90 च्या दशकात जेव्हा कॉम्प्युटरचा वापर वाढत होता तेव्हा खूप नोकऱ्या जातील असे बोलले जात होते. मात्र, कॉम्प्युटर आल्याने नवीन रोजगाराच्या संधी तयार झाल्या. त्याचा परिणाम सध्या आपण पाहत आहोत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने काही नोकऱ्या जातील मात्र, नव्या संधीही उपलब्ध होतील. प्रॉम्प्ट इंजिनिअर आणि सिस्टिम कंन्सलटंट च्या संधी वाढतील, असे UnearthInsight चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव वासू यांनी म्हटले.
2025 पर्यंत आटीमधील AI टुलचा वापर किती?
आयटी कंपन्या अधिक कार्यक्षमतेने क्लायंटला सेवा देण्यासाठी जनरेटिव्ह AI मध्ये पुढील दोन वर्षात 50 ते 100 मिलियन डॉलर गुंतवणूक करतील, असे अभ्यासात म्हटले आहे. सुरुवातील AI टुलमध्ये केलेली गुंतवणूक कंपन्यांना पुढील काळात चांगला नफा मिळू शकतो.
जनरेटिव्ह AI म्हणजे काय?
जनरेटिव्ह AI म्हणजे वापरकर्त्याने सिस्टिमला कमांड दिल्यानंतर इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ किंवा इतर प्रकारचे रिझल्ट मिळतात त्यास जनरेटिव्ह AI असे म्हणतात. एखाद्या विषयावर AI टूल कडून जो लेख लिहून मिळतो ते जनरेटिव्ह एआयचे उदाहरण होय. चॅट जीपीटी हे जनरेटिव्ह एआयचे टुल आहे.