आघाडीची वाहन निर्मिती कंपनी जनरल मोटर्सने ग्राहकांना विकलेल्या तब्बल 8 लाख 25 हजार गाड्या माघारी बोलवल्या आहेत. या वाहनांमध्ये गंभीर चूक असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि कॅनडामधून कार, ट्रक्स आणि इतर प्रकारची वाहने कंपनीने पुन्हा माघारी घेतली आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप झाला आहे.
वाहने मागे बोलावण्याचे कारण काय? (Reason behind Recall)
कंपनीने माघारी बोलवलेल्या वाहनांना दिवसासुद्धा चालू राहील अशी 'डे टाईम लाइट' हे फिचर दिले आहे. मात्र, गाडीची पुढील हेडलाइट सुरू केल्यानंतर डे लाइट बंद करता येत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालवताना अतिरिक्त प्रकाश पडतो. यामुळे समोरून येणाऱ्या चालकाला काहीच दिसत नाही. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याचा कंपनीने एक समिती नेमून अभ्यास सुरू केला होता. समितीने दिलेल्या निष्कर्षानंतर अशा पद्धतीचे फिचर असलेली वाहने माघारी बोलावण्यात आली.
कोणती वाहने माघारी बोलावली- (Vehicles Recalled)
Cadillac CT4, CT5, बुइक एनव्हिजन, कॅडलिक एस्कालेड, Escalade ESV, Chevrolet Silverado 1500, Suburban, Tahoe, GMC Sierra 1500, Yukon, and Yukon XL ही वाहने कंपनीने माघारी बोलावली आहेत. यामध्ये ट्रॅक्स आणि इतर वाहनांचाही समावेश आहे. एकट्या अमेरिकेतून 7 लाख ४० हजार आणि कॅनडामधून 85 हजार वाहने कंपनीने माघारी बोलावली आहेत.
वाहन सुरक्षा नियमांचे उल्लंघन - (violation of safety standards)
जनरल मोटर्स कंपनीने यु.एस फेडरल व्हेइकल सेफ्टी स्टॅडर्ड्स नियमांचे पालन केले नाही, असे राष्ट्रीय तेथील महामार्ग वाहतूक सुरक्षा विभागाने म्हटले आहे. अतिरिक्त प्रकाशामुळे दृश्यमानता कमी होत असल्याचेही म्हटले आहे. अतिरिक्त प्रकाशामुळे एखादा अपघात झाल्याचे अद्याप समोर आले नाही, असा दावा जनरल मोटर्सने केला आहे.