Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

G20 India Presidency : G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा असाही फायदा, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला उभारी 

G20 India Presidency

Image Source : www.prokerala.com

G20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.

पुढच्या एका वर्षासाठी भारताकडे G20 गटाचं अध्यक्षपद (G20 Presidency) चालून आलं आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बाली इथल्या कार्यक्रमात इंडोनेशियाकडून (Indonesia) अध्यक्षपदाचा स्वीकार केला. जी20 परिषद (G20 Summit) नेमकी काय आहे. आणि अध्यक्षपदाचा भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) कसा फायदा होईल याविषयी सविस्तर तुम्ही या लेखांमधून वाचू शकता .    

पण, या परिषदेचा आणखी एक फायदा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताला होणार आहे . आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोव्हिडच्या उद्रेकामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला यामुळे उभारी येऊ शकेल.    

मागची दोन वर्षं हे उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडलेत. पण, आता जी-20 परिषदांच्या बैठकांच्या निमित्ताने पुढच्या वर्षभरात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका देशात होणार आहेत. या बैठका सचिव, विभागप्रमुख स्तरावरील असतील. तर मुख्य बैठक देशांचे मंत्री तसंच राष्ट्रप्रमुखांच्या स्तरावरही होणार आहेत. त्यामुळे या बैठकांच्या निमित्ताने लाखभर लोक वर्षभरात भारतात येतील.    

नवी दिल्ली, बंगळुरू, चंदिगड, गुवाहाटी, चेन्नई, औरंगाबाद, इंदूर, जयपूर, लखनौ, कोलकाता, पुणे, सुरत, उदयपूर, गँगटोक आणि हैदराबाद इथं या बैठका होणार आहेत. या शहरांमधल्या आणि आजूबाजूच्या पर्यटनाच्या ठिकाणांना त्यामुळे व्यवसायाची चांगली संधी मिळणार आहे.    

कोव्हिडच्या लॉकडाऊन नंतर हळू हळू हॉटेल उद्योग पूर्वपदाला येण्याचा प्रयत्न करतोय. आणि 2022 साली देशातल्या एकूण हॉटेल रुम बुकिंगचं प्रमाण 70% वर येऊन ठेपलंय. पण, आता खरा बिझिनेस 2023 मध्ये होईल अशी आशा हॉटेल व्यावसायिकांना आहे.    

हॉटेल आणि पर्यटनाबरोबरच देशांतर्गत विमान, रेल्वे आणि इतर प्रवास तसंच देशांतर्गत घरगुती उत्पादनं आणि भेटवस्तूंची बाजारपेठ या सगळ्यांना चांगली संधी असेल.    

‘कोव्हिडचा वाईट काळ हॉटेल व्यवसायाने मागे टाकलाय असं आपण आता म्हणून शकतो. हा काळ आमच्या उद्योगासाठी सगळ्यात वाईट होता, हे कुणीही नाकारू शकणार नाही. रुम रिकाम्या ठेवाव्या लागत होत्या. त्यांच्यासाठीचे दर कमी झाले. आणि हॉटेलचा महसूल कमी झाला. असं सगळ्याच स्तरावर नुकसान सहन करावं लागल्यानंतर आता कुठे दिवस बदलतायत.’ अशा शब्दांत हॉटेल व्यावसायिकांच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष K B कचरू यांनी आपल्या भावना पीटीआयशी बोलताना व्यक्त केल्या.     

पण, या चांगल्या बाजूला एक काळी किनारही आहे. कारण, पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात येण्याचं प्रमाण वाढेल. आणि त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास, हॉटेल बुकिंग तसंच टॅक्सी सेवाही महाग होण्याची शक्यता आहे. आणि याचा फटका देशातल्या जनतेला बसू शकतो.    

त्यामुळे लोकांनी प्रवास करताना त्याचं काटेकोर नियोजन आणि वेळेत विमान तसंच हॉटेलचं बुकिंग करणं गरजेचं होऊन बसणार आहे.