आजपासून कार किंवा बाईक घेणं महाग होणार आहे. यावेळी वाहनांच्या किमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे विम्याच्या प्रीमियममध्ये झालेली वाढ हे आहे. अलीकडेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)ने जाहीर केल्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम (Third Party Insurance) 1 जूनपासून वाढवला आहे.
वाहन उद्योगात यापूर्वीही चिपचा तुटवडा असल्यामुळे आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे मंदीचे वातावरण होते. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीही वाढवल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना गाडी खरेदी करणं महाग झाले आहे. आता त्यात विम्याचा प्रीमियम वाढवल्याने गाडी खरेदी करताना ग्राहकांना विम्याचे अधिकचे पैसेही भरावे लागणार आहेत. कारण विम्याचा प्रीमियम वाढल्याने साहजिकच नवीन कार आणि दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांची ऑन-रोड किंमत वाढणार आहे.
दुचाकींच्या (Two Wheeler) किमती किती वाढणार?
दुचाकींच्या ऑन-रोड किमती सुमारे 15 टक्क्यांनी वाढणार आहेत. दरम्यान, यात एक चांगली गोष्ट अशी आहे, ती म्हणजे विमा प्रीमियममधील वाढ ही फक्त 150 सीसी (150 CC )वरील मोटरसायकलवर लागू आहे. यामध्ये बजाज पल्सर (Bajaj Pulsar), केटीएम आरसी 390 (KTM RC 390), रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfield Bullet) आणि अशा प्रकारच्या इतर अनेक वाहनांचा समावेश आहे. नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांना विम्यासाठी 17 टक्के अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.
150 ते 350 सीसी (150-350 CC) पर्यंतच्या दुचाकींना 1,366 रुपये आणि 350 सीसी (350 CC)वरील बाईकना 2,804 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
कार खरेदी करणं महाग झालं!
चार चाकी गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 1000 सीस ते 1500 सीसी (1000-1500 CC) या प्रकारातील गाड्यांसाठी विमा प्रीमियमची रक्कम 6 टक्क्यांनी वाढणार आहे. या गाड्यांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये 23 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे; ही वाढ प्रत्येक सर्व प्रकारच्या इंजिन क्षमतेसाठी लागू असणार आहे. 1000 सीसी ते 1500 सीसी (1000-1500 CC) या दरम्यान वाहन क्षमता असलेल्या गाड्यांची नवीन नोंदणी करताना थर्ड-पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 11 टक्क्यांची वाढ होईल.
1000 सीसी आणि 1500 सीसी मधील इंजिन क्षमता असलेल्या खाजगी कारसाठी 3,416 रुपये प्रीमियम आकारला जाईल. तर 1500 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी 7,890 रुपये प्रीमियम आकारला जाईल.
इलेक्ट्रिक वाहनांना दिलासा
नवीन अधिसूचनेनुसार, हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रीमियम विम्यावर (Electric Car Insurance) 7.5 टक्क्यांची सवलत असणार आहे. 30 किलोवॅट (Kilo Watt) पर्यंत बॅटरी असलेल्या खाजगी इलेक्ट्रिक कारसाठी 1,780 रुपये प्रीमियम आकारला जाणार आहे. तर 30 ते 60 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी-पॅक खाजगी इलेक्ट्रिक कारसाठी 2,904 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
गाडी खरेदी करताना, मग ती चार चाकी असो किंवा दुचाकी, सरकारी नियमाप्रमाणे विमा (Insurance) आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) घेणं अनिवार्य (Compulsory) आहे. विमा काढलेल्या गाडीचा अपघात झाल्यास विमा कंपनीकडून नियमानुसार नुकसान भरपाई मिळते.