आरोग्य विमा काढण्याची प्रक्रिया जेवढी सोपी असते, त्याच्या दुप्पट खिचकट प्रक्रिया विम्याच्या क्लेमची असते. आजारपण, अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये विमा क्लेम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विमा क्लेम मंजूर होण्यासाठी अनेक दिवस जातात. अनेक प्रकरणांमध्ये तर विमा कंपन्यांकडून क्लेम नाकारलाही जातो. मात्र, आता सरकारकडून ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सरकारकडून लवकरच विमा क्लेमची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले जाणार आहे. या नवीन पोर्टलचा फायदा नागरिकांसह हॉस्पिटल्सला देखील होईल.
लवकरच सुरू होणार नवीन पोर्टल
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे (NHA) विमा क्लेमची प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी हे पोर्टल तयार केले जाणार आहे. देशभरातील सर्व प्रमुख हॉस्पिटल्स विविध विमा कंपन्यांकडे क्लेम करण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतील.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे हे पोर्टल सुरू करण्यावर काम केले जात आहे. यासोबतच, लसीकरणाशी संबंधित eVIN प्लॅटफॉर्म आणि पोर्टेबल मेडिकल सेंटर आणि ऑपरेशन थिएटर BHISM क्यूब्स महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नवीन पोर्टलचे फायदे
पुढील काही महिन्यांमध्ये विमा क्लेमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या हॉस्पिटल्सला क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या स्वतंत्र पोर्टलचा वापर करावा लागतो. ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ व किचकट असल्याने नवीन पोर्टल उपलब्ध केले जाणार आहे.
नवीन पोर्टलमुळे देशभरातील प्रमुख हॉस्पिटल्सला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे क्लेम करता येईल. यामुळे रुग्णांची क्लेम प्रक्रिया खूपच जलद होईल व दावे मंजूर होण्याचे प्रमाणही वाढेल. याशिवाय, सध्या विमा क्लेम करताना वेगवेगळ्या पोर्टलवर डेटा अपलोड करावा लागतो. एकच पोर्टल असल्यास डेटा अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही बचत होईल. एकाच ठिकाणी रुग्णांचा डेटा उपलब्ध झाल्यास हॉस्पिटलसह विमा कंपन्यांनाही क्लेम मंजूर करताना मदत होईल.
eVIN प्लॅटफॉर्म
कोरोना व्हायरस महामारीच्या काळात नागरिकांच्या लसीकरणासाठी Co-WIN अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. याच धर्तीवर लसीकरणासाठी सकारकडून eVIN प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जाणार आहे.
eVIN प्लॅटफॉर्मवर मुलांची जन्मतारीख, त्यांचे लसीकरण व त्याबाबतचे सर्टिफिकेट इत्यादी माहिती उपलब्ध असेल. अंगणवाडी व शाळांमध्येही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल. पुढील काही महिन्यांमध्ये लसीकरणाशी संबंधित हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.