भारत ही जगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एफपीआयने (FPI) मे महिन्यात 43 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक मागील 9 महिन्यातील गुंतवणुकीपेक्षा सर्वात जास्त होती. तर जून महिन्यात एफपीआयमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 16 हजार 400 कोटींची यशस्वी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रात करण्यात आली आहे, जाणून घेऊयात.
जून महिन्यात 16 हजार 400 कोटींची गुंतवणूक
भारत हा विकसनशील देश असल्याने भारतीय बाजारपेठे सध्या मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. त्यामुळेच यामध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. NSDLच्या आकडेवारीनुसार भारतीय बाजारपेठत एफपीआयने जून महिन्यात आत्तापर्यंत 16 हजार 400 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर मे महिन्यात एकूण 43 हजार 838 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. विशेष म्हणजे गेल्या 9 महिन्यातील ही सर्वात जास्त गुंतवणूक आहे. ज्याचा फायदा भारतीय बाजारपेठेला झाला आहे.
'या' क्षेत्रात गुंतवणूक वाढली
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतील वित्तीय आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यासोबतच आयटी, मेटल आणि टेक्सटाईल क्षेत्रातील शेअर्समध्ये देखील गुंतवणूक करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक यापुढे देखील वाढेल, असे मत गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गुंतवणूक तज्ज्ञांचे मत काय?
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार डॉ. वी. के. विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2023 पर्यंत एफपीआयने भारतीय बाजारपेठेत एकूण 16 हजार 400 कोटींची गुंतवणूक केली आहे. यावरून असे लक्षात येते की, विदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारपेठेकडे लक्ष आहे. त्यांचा भारतीय अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या संभाव्य उत्पन्नावरील विश्वास वाढला आहे.त्यामुळे दिवसागणिक भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली आहे.
Source: hindi.moneycontrol.com
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            