Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Forbes Asia Heroes of Philanthropy : Gautam Adani आशियातल्या सर्वात मोठ्या देणगीदारांच्या यादीत 

गौतम अदानी

Image Source : www.bloomberg.com

फोर्ब्स आशिया तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आशियातील सर्वोत्तम देणगीदारांच्य यादीत अदानी उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यासह तीन भारतीयांनी स्थान मिळवलं आहे. 6 डिसेंबरला ही यादी प्रसिद्ध झाली.

भारतातले सगळ्यात श्रीमंत आणि जगातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आशियातल्या देणगीदारांच्या यादीतही मानाचं स्थान मिळवलं आहे. फोर्ब्सच्या आशियातल्या सर्वोत्तम देणगीदारांच्या यादीत (Forbes Asia Heroes of Philanthropy) गौतम अदानींसह HCL टेक्नोलॉजीज् चे (HCL Technologies)शिव नादर आणि हॅपीएस्ट माईंड टेक्नोलॉजीज् चे (Happiest Minds Technologies) अशोक सुटा यांचंही नाव आहे.   

अदानी उद्योगसमुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी यावर्षी जून महिन्यात आपला साठावा वाढदिवस साजरा केला. आणि त्यानिमित्ताने त्यांनी तब्बल 60,000 कोटी रुपयांची देणगी देशातल्या सेवाभावी संस्थांना दिली आहे. त्यांच्याच समुहाअंतर्गत येणाऱ्या अदानी फाऊंडेशनला त्यांनी ही देणगी दिलीय. आणि हा निधी आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. गौतम अदानी यांच्या पत्नी प्रिती अदानी या अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत.   

HCL टेक्नोलॉजीज् चे शिव नादर (Shiv Nadar) यांनीही मागच्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीपैकी सुमारे एक अब्ज अमेरिकन डॉलर नादर फाऊंडेशनला दान केले आहेत. 2022 मध्ये त्यांनी नादर फाऊंडेशनला 11,600 कोटी रुपये दिले आहेत. आणि हा पैसा शिक्षण तसंच कौशल्य विकासासाठी वापरला जाणार आहे. नादर  स्वत: एचसीएल कंपनीच्या कार्यकारी मंडळातून 2021 साली पायउतार झाले आहेत.   

तंत्रज्ञान क्षेत्रातले भारतातले आणखी एक अग्रणी अशोक सुटा (Ashok Suta) यांनी वैद्यकीय संशोधन क्षेत्रासाठी यावर्षी 600 कोटी रुपये देऊ केले. त्यांच्याच कंपनीने न्यूरोलॉजी आणि वृद्धापकाळात होणारे आजार यावर संशोधन करण्यासाठी SKAN नावाची एक संशोधन संस्था स्थापन केली आहे. या सस्थेलाच त्यांनी वरील देणगी दिली आहे.   

फोर्ब्स ही जागतिक स्तरावरची एक मीडिया कंपनी आहे. आणि जवळ जवळ 40 देशांमध्ये त्यांची लाईफ स्टाईल मासिकं प्रसिद्ध होतात. फोर्ब्सकडून दरवर्षी जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती, सेवाभाव जपणारी व्यक्ती, देणगीदार अशा वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध होतात. आणि या याद्या मानाच्या आणि विश्वसनीय मानल्या जातात. आशिया स्तरावर त्यांनी काढलेल्या देणगीदारांच्या यादीचं हे सोळावं वर्षं आहे.