नवी दिल्लीत सुरू असलेल्या सोळाव्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये देशातली पहिली सौरऊर्जेवर (Solar Car) चालणारी कार लाँच झाली आहे. आणि विशेष म्हणजे ही कार बनवलीय पुण्यातल्या एका स्टार्टअप (Start up) कंपनीने. प्रथमदर्शनी ही कार टाटा नॅनोसारखी (Tata Nano) दिसते. आणि बॅटरीवर चालणाऱ्या इ-कारच्या (E-Car) श्रेणीतली ही कार असली तरी छतावर सौरऊर्जेच्या पॅनलची (Solar Panel) खास सोय करण्यात आली आहे. म्हणजे कारची बॅटरी सौरऊर्जेनं सुद्धा चार्ज होऊ शकेल.
‘वायवे मोबिलिटी’ (Vayve Mobility) या कंपनीने बनवलेल्या या कारचं नाव आहे ‘इव्हा’ (Eva ). आणि या छोटेखानी कारमध्ये सध्या दोन मोठे आणि एक लहान असे तिघं जण बसू शकतात. त्यामुळे तीन जणांच्या छोट्या कुटुंबासाठी ही कार बनलीय असं म्हणावं लागेल.
सध्या या इ-कारच्या विविध चाचण्या सुरू आहेत. आणि 2024 पर्यंत तिची बांधणी पूर्ण होईल, असं वायवे कंपनीने सांगितलं आहे.
‘इव्हाची वैशिष्ट्यं’
इव्हामध्ये असलेलं इलेक्ट्रिकल इंजिन 6 किलोवॅट क्षमतेचं आहे. आणि त्यातून 16 अश्वशक्ती इतकी पॉवर तयार होऊ शकते. यातलं बॅटरी पॅक 14 kWh क्षमतेचं आहे. आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर कार 250 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. वायवे कंपनीने अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोच्या ऑफरही देऊ केल्या आहेत.
पुढच्या वर्षी पुणे आणि बंगळुरू इथं कारचा वापर सुरू होणार आहे. कारची किंमत, बुकिंग आणि इतर माहिती अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पण, ऑटो एक्सपोमध्ये ही कार लाँच झाल्या झाल्या तिची चर्चा सुरू झालीय. काहींना ही कार हे नवं इनोव्हेशन वाटतंय. तर काहींनी दरवाजे असलेली मोटार सायकल अशीही संभावना केली आहे.