भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. पुढील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्याबाबतीतही अव्वल स्थान गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
ग्राहक देखील नवीन गाडी खरेदी करताना इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारचे ई-वाहनांसाठी धोरण काय आहे? भारतीयांमध्ये इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय असण्यामागचे कारण काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ
काही वर्षांपर्यंत पेट्रोल व डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत असे. मात्र, आता या गाड्यांची जागा ई-वाहने घेऊ लागली आहेत. केवळ इलेक्ट्रिक बाईक्स, कारच नाही तर इलेक्ट्रिक स्कूटर्स व तीनचाकी रिक्षांची लोकप्रियताही सर्वाधिक आहे.
ई-वाहनांच्या लोकप्रियतेचे सर्वात प्रमूख कारण पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती हे आहे. भारतात खासगी वाहन असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे इंधनाची किंमत वाढली की त्याचा फटका वाहनचालकांना बसतो. त्यामुळे ई-वाहनांना खरेदी करण्यास पसंती दिली जात आहे. याशिवाय, लोकांमध्ये प्रदूषणाविरुद्ध जागरूकताही पाहायला मिळत आहे.
भारतात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विक्री झालेल्या ई-वाहनांचा आकडा 12 लाखांपेक्षा अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा तब्बल 150 पटींनी अधिक आहे. या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.
सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
सरकारकडून ई-वाहनांच्या देशांतर्गत निर्मिती व खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी ई-वाहन धोरणालाही मंजूरी देण्यात आली आहे. याआधी जास्त सीमा शुल्कामुळे जगभरातील वाहन उत्पादक कंपन्या भारतात गाड्यांची निर्मिती करत नव्हत्या. मात्र, सरकारच्या नवीन धोरणानुसार 4150 कोटी रुपयांच्या (500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) किमान गुंतवणुकीसह भारतात मॅन्युफॅक्चरिंग यूनिट स्थापन करणाऱ्या उत्पादकांना सीमा शुल्कात जवळपास 15 टक्के सवलत मिळेल. सरकारकडून भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी इतरही अनेक सवलती कंपन्यांना दिल्या जात आहे.
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांनाही करात सवलत दिली जात आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना कर्ज काढल्यास आयकर कायद्यातील कलम 80EEB अंतर्गत कर सूट मिळते. त्यामुळे इतर वाहनांच्या तुलनेत ई-वाहन खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे. याशिवाय, ई-वाहनांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरही सरकारकडून भर दिला जात आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे तुमच्यावर कसा परिणाम होणार?
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे इंधनावर होणारा मोठा खर्च वाचणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालकांना यावर वर्षाला हजारो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, त्याजागी ई-वाहनांचा वापर केल्यास हा खर्च निम्म्यावर येऊ शकतो. कच्चा तेलाची आयात कमी होण्यासही मदत होईल.
तसेच, जगभरातील मोठमोठ्या वाहन उत्पादन कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेस बळकटी मिळण्यासोबतच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. सरकार मेक इन इंडिया ई-वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे भविष्यात देशांतर्गत निर्माण झालेल्या इलेक्ट्रिक गाड्या कमी किंमतीत उपलब्ध होतील.