प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात एंट्री करण्याची शक्यता आहे. भारत वाहन विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्सची भारतात विक्री होते. मात्र, अद्याप टेस्लाच्या वाहनांची भारतीय बाजारात विक्री केली जात नव्हती. जानेवारीत गुजरातमध्ये होणाऱ्या वायब्रेंट गुजरात समिट 2024 मध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या एंट्रीने भारतीय इलेक्ट्रॉनिक व्हीकल मार्केटवर काय परिणाम होईल ? त्याविषयी जाणून घेऊया.
टेस्लाची भारतात एंट्री
पुढील काही दिवसात टेस्लाच्या भारतीय बाजारातील एंट्रीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे होणाऱ्या वायब्रेंट गुजरात समिट 2024 मध्ये याची घोषणा केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, इलॉन मस्क स्वतः उपस्थित राहून याबाबतची घोषणा करू शकतात. तसेच, उत्पादन फॅक्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत देखील सरकारशी सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आहे.
जून 2023 मध्ये मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत देखील टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत चर्चा झाली होती. टेस्लाकडून जास्त आयात करामुळे अद्याप भारतात गाड्यांची विक्री जात नव्हती. तसेच, भारतात गुंतवणुकीचा निर्णय देखील बदलला होता. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांवर करात सूट मिळाल्यास टेस्लाला याचा फायदा होऊ शकतो.
भारतीय ईव्ही बाजारावर होणार परिणाम
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट वेगाने वाढत आहे. सध्या भारतीय बाजारात ईव्ही वाहनांचा वाटा 2.4 टक्के आहे. भविष्यात हा आकडा नक्कीच वाढणार आहे. सरकारकडून देखील सातत्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, कंपन्यांना देखील भारतात फॅक्ट्री सुरू करण्यासाठी सहकार्य केले जात आहे.
सध्या भारतात एमजी, ह्युंडाई, मर्सडीज आणि ऑडीसह टाटा मोटर्स, महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध आहे. टेस्लाच्या एंट्रीने या कंपन्यांना तगडे आव्हान मिळू शकते. यामागचे कारण म्हणजे टेस्लाची आंतरराष्ट्रीय बाजारातील लोकप्रियता.
कंपनी सुरुवातीला Tesla Model 3 आणि Tesla Model Y ची विक्री करण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी मेड-इन इंडिया कार देखील भारतात लाँच करू शकते व या गाडीची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. कंपनीने प्लांट सुरू केल्यास पुढील 1 ते 2 वर्षात टेस्लाच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.
रोजगाराच्या संधी
टेस्ला गुजरातमधील सानंद येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करू शकते. येथून जवळच कांडला-मुंद्रा बंदर असून, कंपनीला भारतात निर्मिती गाड्या इतर देशात निर्यात करण्यास सोपे जाईल. याच ठिकाणी टाटा मोटर्सच्या कारची देखील निर्मिती केली जाते. याशिवाय, मारुती सुझुकी आणि एमजी मोटर सारख्या कंपन्यांचे प्लांट देखील गुजरातमध्ये आहेत. रिपोर्टनुसार, कंपनी जागेसाठी 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता असून, यामुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.