2030 पर्यंत एकूण कारपैकी 50% इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री होईल, अशा विश्वास टाटा कंपनीने व्यक्त केला आहे. टाटा सध्या एकूण वाहनांच्या फक्त 8 ते 9 टक्के इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री करते. मात्र, भविष्यात यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारमध्ये टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांना (Tata EV Cars) मोठी मागणी आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक कार विक्रीत आणखी वाढ होईल, असा विश्वास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्स ही देशातील अशी पहिली कंपनी आहे जिने मागील वर्षात 50 हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकल्या. सध्या कंपनी नेक्सॉन, टिगॉर आणि टियागो या EV गाड्यांची विक्री करते. यांचा बाजारातील एकूण वाटा 90 टक्के आहे. या महिन्याच्या शेवटी टाटा टियागो गाडीचे इव्ही मॉडेल खरेदी करता येणार आहे. याची किंमत साडेआठ लाखांपासून पुढे आहे. टियागो इव्ही कार 20 हजार ग्राहकांनी बुक केली आहे. पहिल्यांदाच कार विकत घेणाऱ्यांकडून या कारला पसंती मिळत आहे. बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातही टियागो इव्ही कारची मागणी वाढत आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. टियागो गाडी बूक केलेल्यांपैकी 28% ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेल गाडी घेण्याचा विचार देखील केला नाही, असे टाटा कंपनीच्या मार्केटिंग विभागाचे अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले. सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे आकर्षण आहे. 2030 पर्यंत देशात 30% गाड्या इलेक्ट्रिक असतील, असे सरकारने देखील म्हटले आहे. मात्र, टाटाच्या गाड्यांचा बाजारातील हिस्सा 50% असेल श्रीवास्तव म्हणाले.
येत्या काही दिवसांत आणखी दोन इव्ही गाड्या लाँच करण्याचे नियोजन टाट मोटर्सने केले आहे. पुढील पाच वर्षात टाटाच्या एकूण 10 इव्ही गाड्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. देशामध्ये प्रवासी गाड्यांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. तीन वर्षापूर्वी देशभरत फक्त 3 हजार इलेक्ट्रिक गाड्या विकल्या गेल्या होत्या. मात्र, मागील वर्षभरात 60 हजार EV गाड्यांची विक्री झाली.
पेट्रोल,डिझेल गाड्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याने सरकारने वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी कठोर नियमावली जारी केली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अनुदान आणि इतर योजनांद्वारे सहकार्य करण्यात येत आहे. हायड्रोजन इंधन निर्मिती आणि वापरालाही प्रोत्साहन देण्यात येत आहे.