लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा असतो. या सोहळ्याला संस्मरणीय बनवण्यासाठी अमाप खर्च केला जातो. वधुवरांच्या हौसेच्या सर्व गोष्टी लग्न समारंभात असतात. एका दिवसाच्या या सोहळ्यासाठी लाखो-कोटी रुपये खर्च केले जातात. काहीजण तर कर्ज (Loan) काढून मोठ्या थाटामाटात लग्न करतात. मात्र लग्न झाल्यानंतर डोक्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लग्न कार्यात काही अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत. आपण जर हे खर्च टाळले, तर पैशांची बचत होऊ शकते. हेच पैसे इतर ठिकाणी गुंतवून ठराविक वर्षांनी चांगला परतावा (Returns) मिळता येऊ शकतो. पण हे अनावश्यक खर्च कोणते, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
लग्नातील 'हे' अनावश्यक खर्च टाळा
बॅण्डबाजावर होणारा अवाढव्य खर्च
लग्न समारंभात वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वाजंत्र्यांवर खर्च केला जातो. मेहंदी, हळद,लग्नानंतरची वरात अशा महत्त्वाच्या प्रसंगी बँड, डॉल्बी यासारख्या गोष्टींवर अमाप खर्च केला जातो. फक्त काही तासांसाठी हजारो-लाखो रुपये खर्च केले जातात. याऐवजी पारंपरिक वाद्य जसे की, सनई, चौघडे, हलगी याचा वापर करून कमी बजेटमध्ये मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पाडता येऊ शकतो. तसेच या वाद्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर येत नसल्याने ध्वनी प्रदूषण देखील होत नाही.
लग्नात नवऱ्याला घोड्यावरून घेऊन येण्याची परंपरा आहे. अर्थात ही गोष्ट अनिवार्य नसून हल्ली हौसेचा भाग म्हणून केली जाते. ग्रामीण भागात नवरा गावदेव दर्शनासाठी जाताना घोड्यावरून घेऊन जाण्याची प्रथा आहे. तर शहरी भागात हॉलवर जाण्यासाठी घोडा सांगण्यात येतो. तास-दोन तासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्याचा दर हा 15 हजारापासून सुरू होतो. नावाजलेल्या घोड्याचे दर हे सामान्य घोड्यापेक्षा जास्त असतात. हल्ली हौस म्हणून वापरला जाणारा घोडा खरंच आवश्यक आहे का? हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
हळदीसाठी पाण्याचा टँकर आणणे
लग्न समारंभातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 'हळद'. हीच हळद खेळण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई असताना देखील पाण्याचा टँकर ऑर्डर करून हळद खेळली जाते. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर ऑर्डर केले जातात. हे टँकर क्षमतेनुसार उपलब्ध असतात. साधारण छोट्या आकाराच्या टँकरसाठी 5 हजार रुपये मोजावे लागतात. हळदीच्या कार्यक्रमात अतिरिक्त पाणी वाया तर जातेच, सोबत पाण्यावर हजारो रुपये खर्च केले जातात.
जास्त अतिथींना लग्नाचे आमंत्रण देणे
लग्न आयुष्यात एकदाच होते. या विचाराने अनेकजण सर्व पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण देतात. साहजिकच त्यांच्या पाहुणचारात आणि खानपानात जास्त पैसे खर्च होतात. याउलट जर मोजक्याच लोकांच्या समवेत लग्नाचा सोहळा साजरा केला, तर कमी खर्चात आणि आनंदात कार्यक्रम पार पडतो.