कतार हा पश्चिम आशियातील एक श्रीमंत देश. फिफा वर्ल्ड कप 2022 चे यजमानपद मिळाल्याने आता हा देश आणखी मालामाल होणार आहे. वर्ल्ड कपचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी कतारला भेट देणार आहेत. कतारने अनेक वर्षांपासून या मेगा इव्हेंटसाठी तयारी केली होती. तब्बल 200 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करुन वर्ल्ड कपसाठी नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. आता यातून कतार पुढील महिनाभर फुटबॉलप्रेमींचे आदरतिथ्य करण्यात बिझी राहणार आहे.
FIFA वर्ल्ड कप 2022 ला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 28 दिवसात 64 सामने होणार असून असून 18 डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे.या स्पर्धेसाठी 32 संघ निश्चित झाले आहेत. या 32 जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी 210 संघांमध्ये स्पर्धा होती. यावरुन फुटबॉलची जागतिक लोकप्रियत्ता लक्षात येते. आयएमएफच्या अंदाजानुसार चालू वर्षात कतारचा जीडीपी 3.4% इतका वाढण्याची शक्यता आहे.
जगभरातील 15 लाख फुटबॉलप्रेमी कतारला भेट देण्याची शक्यता
फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडाप्रकार मानला जातो. यामुळे जगभरातून 15 लाख फुटबॉलप्रेमी या स्पर्धेनिमित्त इथे भेट देतील असा आयोजकांचा अंदाज आहे. कतारची लोकसंख्या सुमारे 29 लाख इतकी आहे. म्हणजे लोकसंख्येच्या जवळजवळ निम्मे लोकं कतारमध्ये जाणार आहेत. यामुळे कतारमधील आर्थिक उलाढाल प्रचंड वाढणार आहे. त्याचा कतारच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. कतारला किमान 7.5 बिलियन डॉलर्सचे उत्पन्न हे प्रेक्षकांकडून मिळण्याची शक्यता आहे.
कतारची सज्जता
लाखो प्रेक्षक कतारला येणार आहेत. त्याचं खाण-पिणं, राहणं, फिरणं, खरेदी करण यातून या कतारच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त बुस्टर मिळणार आहे. जीडीपी वाढवण्यासाठी एवढी मोठी संधी चालून आल्यामुळे कतार देखील सज्ज झाला आहे. स्पर्धेसाठी कतारमध्ये जाणाऱ्या जगभरातील फुटबॉलप्रेमींना राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून या देशाने नव्याने हॉटेल्स उभारली आहेत. 2019 सालीच कतारने एक क्रूज कंपनीसोबत करार केलाय. त्यानुसार, फ्लोटिंग हॉटेलची सज्जता केली जात आहे. स्पर्धेसाठी 8 भव्य स्टेडियम सज्ज आहेत. त्यातील 7 स्टेडियम खास नव्याने तयार केली आहेत. एक शहरच नव्याने उभे केले आहे. जेथे अंतिम सामना रंगणार आहे. इमारती आणि बंगल्यातील 60 हजार जागा, 50 हजार हॉटेल्स रुम, 9 हजार फॅन व्हिलेज, 4 हजार जहाजावरील खोल्या अशी निवासाची सज्जता करण्यात आली आहे.