ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शहरात शिक्षणासाठी येताना सुरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाने एक योजना सुरु केली आहे. स्त्री शिक्षणाला चालना मिळावी, प्रवासाची वाहने उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना राबवली जाते आहे.
खरे तर आज देखील ग्रामीण भागात वाहतुकीच्या समस्या आहेत. एसटीमुळे खरे तर ग्रामीण महाराष्ट्राचं जीवन सुखकर आणि सुकर झालं आहे असं म्हणता येईल. काही प्रमाणात खेडेगावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. मात्र कॉलेजसाठी आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात, तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.
डोंगर दऱ्यात, रानावनात राहणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र शहरांत शिकण्यासाठी जायचं ठरल्यास खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे पालक देखील सुरक्षिततेचं कारण देत मुलींचे शिक्षण बंद करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शाळाबाह्य विद्यार्थिनींचे प्रमाण वाढले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्र सरकारने एक योजना अंमलात आणली.
अहिल्याबाई होळकर मोफत एसटी प्रवास योजना
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एसटी बसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेडेगावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यास ज्या विद्यार्थिनी शाळेसाठी शहरांत जातात केवळ अशांनाच या योजनेचा फायदा घेता येतो. मुख्याध्यापकांच्या सहीने संबंधित आगार प्रमुखाला विद्यार्थिनींची यादी सादर करावी लागते. त्यांनतर विद्यार्थिनींना पास दिला जातो. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील 23 लाख 54 हजार विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
शिक्षणाची संधी मिळाली
कावेरी आहेर ही अ.नगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरे या ग्रामीण भागात राहते. ती नुकतीच 11 वीची परीक्षा उत्तीर्ण झाली असून 12 वीला गेली आहे. कावेरी सांगते, मोफत एसटी प्रवास योजनेमुळे तिचं शिक्षण सुलभ झालं. ती राहते त्या वस्तीपासून एसटीचा थांबा 2 किलोमीटर आहे. रोज दोन किलोमीटर पायी चालत ती बस थांब्यावर जाते आणि संगमनेरला जाण्यासाठी एसटी पकडते. 15 किलोमीटरचा प्रवास एसटीमुळे सुरक्षित झालाय, घरच्यांना देखील माझ्या प्रवासाबद्दल चिंता नसते असं कावेरी सांगते.
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट हे दुर्गम असं गाव. अवंतिका जोर्वेकर या विद्यार्थिनीने रोज धामणगाव पाट ते संगमनेर असा 80 किलोमीटर येण्या-जाण्याचा प्रवास करत तिचं बारावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.आता ती संगमनेर शहरात पदवीचे शिक्षण घेत आहे. अवंतिका सांगते, या योजनेमुळे माझा शाळेचा प्रवास निश्चिंतपणे मला करता आला. बस डेपोने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकानुसार बसचे वेळापत्रक आखले गेले होते, त्यामुळे शाळेला जाताना आणि येताना बसमुळे कधीच गैरसोय झाली नाही असं अवंतिका सांगते.
सदर योजना ही 5 वी ते 12 वी तील विद्यार्थिनींना लागू आहे. त्यामुळे आता 12 वी नंतर विद्यार्थिनी शासनाच्या ‘महिला सन्मान योजने’चा फायदा घेत आहेत. ज्यात महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते. अवंतिकाची अशी मागणी आहे की, विद्यार्थिनींना पदवी शिक्षणापर्यंत मोफत प्रवासाची सवलत दिली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलींना एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत मिळूनही दिवसाला 40-50 रुपये प्रवासासाठी खर्च करणे अवघड जाते. शासनाने याचा विचार करायला हवा अशी अपेक्षा देखील ती व्यक्त करते.