एसटी बसने आपण कधी न काही तरी प्रवास केलाच असेल. परवडणाऱ्या दरात सार्वजनिक दळणवळणाची सुविधा देणाऱ्या आपल्या लाल परीला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाच्या योजना कुणाकुणाला दिल्या जातात याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्रात एकूण 13 हजार 595 बसेस धावत आहेत. दररोज सुमारे 50 ते 55 लाख प्रवासी बसने प्रवास करतात. एका दिवसात 60 ते 65 लाख फेऱ्या मारण्याची कसरत आपली लाल परी करत असते. यातून महामंडळाला दिवसाला सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. उपलब्ध माहितीनुसार एसटी महामंडळाला महिन्याला 850 कोटींचा खर्च येतो तर 720 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु एसटीचा परिचालन खर्च, चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांचे पगार उत्पन्नापेक्षा अधिक असून महामंडळ आर्थिक तोट्यात असल्याचे अनेकवेळा जाहीर केले गेले आहे. असे असले तरी एसटी महामंडळ विशेष अशा तब्बल 30 वेगवेगळ्या प्रवास योजना राबवते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना प्रवासभाड्यात 50% सवलत देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. यासोबतच महामंडळातर्फे विविध सवलती दिल्या जातात त्या देखील आपण जाणून घेऊयात. (Plans offered by ST Corporation in Maharashtra)
महिला सन्मान योजना pic.twitter.com/qIE9WsRJQU
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) March 17, 2023
स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्यासोबत एका साथीदाराला वर्षभर मोफत प्रवास करण्याची सवलत एसटी देत असते. यांत महामंडळाच्या साध्या, निमआराम, आराम,वातानुकुलित अशा चारही प्रकारच्या बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास करता येतो. प्रति लाभार्थी 4000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही 8000 किलोमीटरचा प्रवास स्वातंत्र सैनिक करू शकतात.तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत साध्या, निमआराम,वातानुकुलित आणि शिवशाही (आसनी व शयनयान) बस मध्ये शहिदांच्या पत्नीला आजीवन मोफत प्रवास करता येतो.
महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीला आणि त्यांच्यासोबत एका साथीदाराला एसटीने वर्षभर मोफत प्रवास करण्याची सवलत एसटी महामंडळाकडून दिली जाते. साधी, निमआराम, आराम अशा 3 प्रकारच्या बसेसमधून लाभार्थ्यांना प्रवास करता येतो. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 4000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही 8000 किलोमीटरचा प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती करू शकतात.
तसेच आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना देखील वर्षभर मोफत प्रवास सवलत देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केलेली आहे. आदिवासी पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणारा एक विशेष पुरस्कार आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो. आदिवासी समुदायात कार्यरत असलेल्या समाजसेवक व्यक्तीला एसटी महामंडळ प्रवासात 100% सवलत देते. साधी, निमआराम, आराम अशा तीन प्रकारच्या बसेसने पुरस्कार्थी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास करता येऊ शकतो. एका वर्षात लाभार्थी महाराष्ट्रात कुठेही 4000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते, यात लाभार्थी 1000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात.
याच बरोबर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत देखील एसटी महामंडळाकडून दिली जाते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार महाराष्ट्रातील मातंग समाजातील लोक कलाकार, समाजसेवक, साहित्यिकांना दिला जातो. एका वर्षात लाभार्थी महाराष्ट्रात कुठेही 8000 किलो मीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 4000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.
महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साध्या, निमआराम आणि आराम बसने महाराष्ट्रात कुठेही 1000 किलो मीटर पर्यंतचा प्रवास करता येतो. या योजनेसाठी प्रति लाभार्थी 2000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. प्रवासाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यावरती सोडावे लागत होते. या योजनेचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर झालेला पहायला आढळतो.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशा पत्रकारांना साधी, निमआराम, शिवशाही ( स्लीपर आणि सिटींग) अशा 3 बसेसमध्ये मोफत प्रवास करता येतो.
राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात 50% सवलत दिली जाते. या योजनेत साधी, निमआराम, आराम,शिवशाही (स्लीपर आणि सिटींग) अशा चारही बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलतीत वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही 4000 किलोमीटरचा प्रवास करता येतो. ,
‘आझादी का अमृतमहोत्सव’ च्या निमित्ताने राज्यातील 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही मोफत प्रवास करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यात प्रवासाची कुठलीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाहीये.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मासिक पास सवलत एसटी महामंडळाकडून दिली जाते. साध्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये 66.67% सवलत दिली जाते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ विद्यार्थी घेताना दिसतात.
विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देखील प्रवासात 50% सवलत दिली जाते. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा महिनाभर चालतात, परीक्षा केंद्र देखील जर दुसऱ्या शहरात असेल तर अशा कालावधीसाठी नैमित्तिक पास दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांनी पुरेसे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी किंवा पुन्हा शैक्षणिक संकुलात येण्यासाठी, तसेच आजारी आई वडिलांना भेटण्यासाठी आणि परत येण्यासाठी एसटी महामंडळाकडून खास 50% सवलत दिली जाते. अशा प्रकरणात विद्यार्थी सामान्य बसने महाराष्ट्रात कोठेही प्रवास करू शकतात.
अंध व अंपग व्यक्तींना देखील एसटी महामंडळातर्फे प्रवासात खास सवलत दिली जाते. 40% अपंगत्वाचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असेल तर साधी व निमआराम बसमध्ये 75% आणि शिवशाही बसमध्ये (आसनी) 70% सवलत दिली जाते.
65 % वरील अंध व अंपग व्यक्तींना आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका सहाय्यकाला एसटी बसने प्रवास करताना सवलत दिली जाते. साधी व निमआराम बसमध्ये 50% तर शिवशाही (आसनी) बसमध्ये 45% सवलत देण्यात येते.
कमी करु अपघातांचे प्रमाण... वृध्दींगत करु प्रवशांचा विश्वास..! pic.twitter.com/GouAAaCwjm
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) January 11, 2023
क्षय रोगावर आणि कुष्ठ रोगावर वैदयकीय उपचार घेणाऱ्या प्रवाशाला महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करण्यासाठी 75% सवलत दिली जाते. यात 50 किलोमीटरचा प्रवास रुग्ण करू शकतात.
कर्क रोगावर वैदयकीय उपचार घेणाऱ्या प्रवाशाला महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करण्यासाठी 75% सवलत दिली जाते. यात 1500 किलोमीटरचा प्रवास रुग्ण करू शकतात. कर्करोगावर उपचार करण्यासाठी रुग्णांना वेगवगेळ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत असल्याने जादा किलोमीटरच्या प्रवासाची मुभा प्रवाशांना देण्यात आली आहे.
राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या आणि विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या बसने प्रवास करण्यासाठी 33.33% सवलत महामंडळाकडून दिली जाते. तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना साध्या बसने प्रवास केल्यास एसटी भाड्यात 50% सवलत दिली जाते.
विद्यार्थ्यांचे डबे पुरविणारी एक मोफत योजना देखील एसटी महामंडळाकडून चालवली जाते. शहरात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून पालक एसटीने जेवणाचा डबा मोफत पाठवू शकतात. यासाठी एसटीकडून कुठलेही शुल्क घेतले जात नाही.
कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत 6 महिन्यापर्यंतचा कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करिता विद्यार्थ्यांना एसटी भाड्यावर 66.67% सवलत दिली जाते. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी केलेल्या आणि नियमित हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
क्रीडा क्षेत्रांतील मनाचे समजल्या जाणाऱ्या अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू एसटी महामंडळाच्या साधी, निमआराम, आराम आणि वातानुकुलित अशा चारही बसेसमधून 100% सवलतीत रुपये 2000 पर्यंत प्रवास वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही करू शकतात.
पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवासाची सवलत एसटी महामंडळाकडून दिली जाते. लाभार्थी वारकरी दाम्पत्य महामंडळाच्या साध्या आणि निमआराम बसने महाराष्ट्रात कोठेही करू शकतात. या योजनेत वारकरी दाम्पत्यासाठी 13470 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.
विद्यमान आणि माजी विधानमंडळ सदस्य व त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला वर्षभर मोफत सवलत देण्याची योजना एसटी महामंडळ राबवते. महाराष्ट्रात वर्षभर कुठेही प्रवास करण्याची परवानगी या योजनेमार्फत दिली जाते. एसटी महामंडळाच्या साध्या, निमआराम, आराम,वातानुकुलित आणि शिवशाहीने (आसनी व शयनयान) मोफत प्रवास लाभार्थ्यांना करता येतो.
रेसक्यू होममधील मुलांना आणि मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्टया दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा अभ्यास सहलीकरिता प्रति विद्यार्थी 66.67% सवलत एसटी महामंडळ देत असते. या योजनेत एसटी महामंडळाची साधी बस उपलब्ध करून देण्यात येते.
शासनाच्या अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्तिला आणि त्यांच्यासोबत आणखी एका साथीदाराला मोफत प्रवासाची सुविधा एसटी महामंडळाकडून देण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांना साध्या आणि निमआराम बसने प्रवास करता येतो. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 11,000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.
सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय..! pic.twitter.com/tmifEBAlXX
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) January 9, 2023
दुर्धर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील एसटी प्रवासात 100% सवलत दिली जाते. सिकलसेल आणि हिमोफेलिया रुग्णांना एसटी महामंडळाच्या साध्या आणि निमआराम बसने प्रवास 150 किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
तसेच एचआयव्ही आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना साध्या आणि निमआराम बसने 50 किलोमीटर पर्यंतचा प्रवास तर डायलेसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांना साध्या आणि निमआराम बसने प्रवास 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
एसटी महामंडळातर्फे जवळपास 30 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा काही विशेष नागरिकांना देण्यात येते. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आजच नजीकच्या एसटी महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाला भेट द्या. ज्या योजनेसाठी तुम्हांला अर्ज करायचा आहे त्या योजनेचा फॉर्म भरून द्या. फॉर्म भरताना तुम्हाला तुमची खासगी माहिती, ओळखपत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करावे लागतील हे लक्षात असू द्या.