शेतमालाच्या वायदे व्यवहांवर बंदी घालणाऱ्या सेबी विरोधात स्वतंत्र भारत पार्टी या शेतकरी संघटनेने बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईतील सेबीच्या मुख्यालयासमोर 23 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.
भांडवली बाजार नियंत्रक सेबीने चणे, गहू, तांदुळ, सोयाबीन, राई, पाम तेल आणि मूग या सात कृषी मालाच्या वायदे व्यवहारांवर डिसेंबर 2022 मध्ये बंदी घातली होती. येत्या डिसेंबर 2023 पर्यंत या सातही अॅग्री कमॉडिटीजच्या वायदे व्यवहारांवर बंदी वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सेबीने हा निर्णय रद्द करावा, यासाठी बेमुदत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सेबीचा सात प्रमुख शेतमालाच्या वायदे व्यवहारांवर बंदी घालण्याचा निर्णय हा शेतकरी विरोधी आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा माल विकण्याची संधी मिळायला हवी. वायदे व्यवहारांवर निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजाराचा प्रवेश नाकारला असल्याचे घनवट यांनी सांगितले. या निर्णयांचा शेतकरी आणि सहकारातील ज्या ज्या घटकावर परिणाम होणार आहे ते सर्व घटक आंदोलनात सहभागी होणार आहेत. सातही शेतमालावरील बंदी रद्द करुन त्यातील वायदे व्यवहारांना परवानगी देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
सात धान्य कमॉडिटींमध्ये ट्रेडिंग (Commodity Trading) पुन्हा सुरू करण्याची विनंती कमोडिटी पार्टिसिपंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (CPAI) या कमॉडिटी ट्रेडिंग करणाऱ्या गटाने सेबी (SEBI) आणि केंद्रसरकारकडे केली आहे. या ट्रेडिंगमुळे या धान्य आणि वस्तूंच्या किमती कृत्रिम पद्धतीने वाढू नयेत यासाठी सेबींनं हे पाऊल उचललं होतं.