IT Penalties: आयकर रिटर्न भरताना चुकीची माहिती दिली किंवा उत्पन्न लपवले तर तुम्हाला दंड होऊ शकतो. टॅक्स कमी यावा यासाठी अनेकजण घरभाड्याच्या बनावट पावत्या, डोनेशन, विमा यांच्या बनावट पावत्या पुरवा म्हणून सादर करतात. मात्र, जर आयकर विभागाला तपासणीमध्ये बनावट पावत्या आढळून आल्या तर कारवाईला सामोरे जावे लागेल.
पालकांसोबत एकाच घरात राहत असतानाही काही करदाते वडीलांना भाडे देत असल्याचे पुरावे जोडतात. मात्र, जर पालकांनी आयकर रिटर्न भरताना हे भाड्याचे उत्पन्न दाखवले नाही तर दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. चालू वर्षी आयकर विभागाची अशा बनावट पावत्यांवर करडी नजर आहे. फ्रिलान्सिंग आणि मूनलाइटिंग कामे करणाऱ्या 1100 जणांना कमी उत्पन्न दाखवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली.
जर तुम्ही आयकर रिटर्न भरताना घरभाड्याच्या बनावट पावत्या जोडल्या असतील तर रिवाइज्ड आयटीआर अजूनही फाइल करून कारवाई टाळू शकता.
बनावट पावत्या दिल्यास किती दंड?
आयकर विभाग तुम्ही दिलेली सर्व माहिती पडताळून पाहत असते. आयकर अधिकाऱ्यांना संशय आल्यास ते अतिरिक्त माहिती आणि पुरावे सादर करण्यास सांगू शकतात. (HRA fake proof penalty) जर तुम्ही दिलेले पुरावे खरे असतील तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही बनावट पुरावे सादर करत असाल तर तुम्हाला चुकवलेल्या कराच्या 200% पर्यंत दंड होऊ शकतो. बनावट पावत्या आणि चुकीची माहिती सादर केल्यामुळे आयकर कायद्यातील 270A नुसार तुमच्यावर कारवाई होईल.
आयकर विभागाला चुकीची माहिती सादर करणे आणि कमी उत्पन्न दाखवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आयकर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाते. जो कर चुकवला असेल त्या करावर व्याजदर आकारले जाऊ शकते. त्यामुळे घरभाड्याची माहिती सादर करताना बनावट पावत्या देऊ नका. तसेच जास्त घरभाडे दाखवू नका. अन्यथा अडचणीत याल.