Meta Layoff 6000 Employee Jobs: जागतिक बाजारपेठेत सुरु असलेल्या मंदीमुळे, सामान्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट आणखी गडद होत चालले आहे. गेल्या वर्षभरापासून आयटी क्षेत्रातील कंपन्या सातत्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. तर फेसबुकची मूळ कंपनी असलेली मेटा आता तिसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यापर्यंत मेटा 6000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे.
मार्क झुकेरबर्ग यांचा इशारा
एका महिन्यापूर्वीच मेटाने म्हणजेच मार्चमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरी वरुन काढून टाकण्याची घोषणा केली होती. आता परत मेटाने अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी, मे 2023 मध्ये आणखी कर्मचारी कमी करण्याची घोषणा आधीच केली होती, असे म्हटले जात आहे. पुढील आठवड्यात होणार असलेल्या कर्मचारी कपात मुळे, माझ्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घटकावर परिणाम होईल, अशी माहिती मेटाचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष निक क्लेग यांनी दिली.
याआधी कधी झाली होती कर्मचारी कपात
पुढील आठवड्यात सुमारे 6000 कर्मचारी कपात करणाऱ्या मेटामधून याआधी देखील दोनदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली होती. याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. त्यानंतर मार्च 2023 मध्ये 10,000 कर्मचारी कमी केले. तसेच, मार्च 2023 पासून 4000 कर्मचाऱ्यांना आधीच कमी करण्यात आले आहे आणि आता आणखी उर्वरित 6000 लोकांना कमी करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.