Expressway Launch In 2023: कोणतंही गाव किंवा शहर विकसित होतं ते फक्त आणि फक्त त्याठिकाणच्या वाहतुकीच्या आणि सामाजिक पायाभूत सुविधांमुळे. केंद्र शासनाकडून संपूर्ण भारतात महामार्गांचे जाळे विस्तृत करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न केले जात आहेत. भारतात सगळीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामार्गांचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी 'भारतमाला परियोजना' राबवली जात आहे. या परियोजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत. २०२३ मध्ये भारतात काही महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
या ५ महामार्गांचे होणार लोकार्पण
द्वारका महामार्ग (Dwarka Expressway)
राजधानी दिल्लीसाठी हा महामार्ग मोठा फायद्याचा ठरणार असून यामुळे राजधानीमधील वाहतूक कोंडी फुटणार आहे. हा पहिला शहरी उन्नत द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जाईल. सध्याच्या स्थितीला या महामार्गाचे काम जोरात सुरू असून हा द्वारका एक्सप्रेसवे राजधानीच्या पश्चिम भागाला गुरुग्रामशी जोडण्यात येत आहे. यामुळे NH8 वर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. या द्रुतगती मार्गाची एकूण लांबी सुमारे 29 किमी असून हा 2023 च्या मध्यापर्यंत हा तयार होण्याची अपेक्षा प्राधिकरणाकडून व्यक्त केली जात आहे.
दिल्ली मुंबई महामार्ग(Delhi Mumbai Expressway)
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली यांना जोडणारा हा महामार्ग आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने याला अतिशय महत्त्व आहे. हा 1382 किलोमीटर लांबीचा महामार्ग दिल्लीच्या प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या महामार्गामुळे मुंबईहून दिल्लीचा प्रवास जवळपास 12 तासांनी कमी होईल. या महामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून 2023 च्या पहिल्या तिमाहीत हा लोकांसाठी खुला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमृतसर-जामनगर महामार्ग(Amritsar-Jamnagar Expressway)
अमृतसर-जामनगर महामार्गाची लांबी सुमारे 1,257 किमी असून हा सप्टेंबर 2023 पर्यंत तयार होईल अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीला अमृतसर आणि जामनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी 26 तासांचा कालावधी लागतो,मात्र या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर 13 तासांतच हा प्रवास करणे शक्य होणार आहे. हा महामार्ग तीन ऑइल रिफायनरीज आणि दोन थर्मल पॉवर प्लांटला जोडणार असल्याने औद्योगिक दृष्ट्या या महामार्गाचे महत्त्व वाढले आहे.
मुंबई वडोदरा महामार्ग(Mumbai Vadodara Highway)
दिल्ली मुंबई महामार्गानंतर मुंबई वडोदरा महामार्ग हे दोन महामार्ग 2023 मध्ये तयार होणार असून महाराष्ट्रासाठी हे दोन्ही महामार्ग महत्त्वाचे आहेत. पश्चिम भारतातील दोन प्रमुख शहरे म्हणजेच मुंबई आणि वडोदरा यांना जोडणारा हा महामार्ग औद्योगिक दृष्ट्या अधिक फायद्याचा असणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील एक प्रमुख आर्थिक केंद्र वडोदरा या शहरांना जोडण्यासाठी हा द्रुतगती मार्ग बांधला गेला आहे. या महामार्गाची एकूण लांबी अंदाजे 379 किलोमीटर असून तो अनेक प्रमुख शहरांमधून जात आहे.
अहमदाबाद-धोलेरा महामार्ग(Ahmedabad-Dholera Expressway)
अहमदाबाद-धोलेरा महामार्ग हा गुजरात राज्यातील एक अति महत्त्वाचा प्रकल्प असून यामुळे गुजरात राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. गुजरातमधील अहमदाबादला धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनशी(DSIR) जोडणारा हा एक केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 110 किलोमीटर असून हा महामार्ग गुजरातमधील अनेक प्रमुख शहरांना जोडला जाणार आहे.