प्रत्येक सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्याच्या पगारातील ठराविक रक्कम ही मासिक स्वरूपात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये (EPFO) जमा केली जाते. ही रक्कम कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत किंवा निवृत्तीनंतर वापरू शकतात. सध्या जगभरात आर्थिक मंदीचा फटका अनेकांना बसत आहेत. हाच फटका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेला देखील बसला आहे. EPFO ने गुरुवारी (दि.20 एप्रिल) जाहीर केलेल्या अहवालात फेब्रुवारी महिन्यात नवीन सदस्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे नमूद केले. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात 10 टक्क्यांनी घट झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
EPFO खात्यात नवीन आणि जुने सदस्य मासिक स्वरूपात ठराविक रक्कम गुंतवत असतात. पण गेल्या दोन महिन्यात नवीन सदस्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात EPFO मध्ये एकूण 13.96 लाख सदस्य जोडले गेले आहेत. त्यापैकी नवीन सदस्यांची संख्या ही 7.38 लाख इतकी आहे. जानेवारी महिन्यात नवीन सदस्यांची संख्या 8.19 लाख इतकी होती. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात चक्क 10 टक्के सदस्य कमी झाल्याचे या अहवालातून दिसून आले.
घट होण्याचे कारण काय?
सध्या जगभरात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच नोकरकपातीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहे. अशा परिस्थितीत बहुसंख्य कंपन्यांनी नोकरभरतीची प्रक्रिया संथ केली आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम EPFO खात्यातील गुंतवणुकीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी मे 2021 नंतर EPFO मध्ये सामील होणार्या सदस्यांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी केवळ 6.49 लाख नवीन सदस्य ईपीएफओशी जोडले गेले होते. विशेष म्हणजे या आकडेवारीवरून देशातील ठराविक क्षेत्रातच नवीन नोकऱ्या निर्माण होत असल्याचे दिसून येते.
कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, EPFO मध्ये पहिल्यांदाच सामील झालेल्या सदस्यांपैकी 2.17 लाख लोक हे 18 ते 21 वयोगटातील आहेत. 1.91 लाख लोक हे 22 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. यावरून असे समजते की, 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची संख्या 55.37 टक्के आहे. याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
याशिवाय बऱ्याच जुन्या सदस्यांनी नोकरी बदलून पुन्हा एकदा EPFO शी जोडले गेले आहेत. साधारण 10.15 लाख लोक परत एकदा EPFO मध्ये सामील झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत EPFO मध्ये पुन्हा सामील होणा-या लोकांच्या संख्येत 8.59 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
Source: abplive.com