गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांनी ट्विटरच्याबाबतीत मोठे आर्थिक निर्णय घ्यायचा सपाटा लावलाय. त्यातच आता त्यांनी ट्विटरबाबत आणखी एक गंभीर इशारा दिलाय. खर्चात कपात न केल्यास ट्विटर दिवाळखोरीत जाण्याची भीती मस्क यांनी व्यक्त केली आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे ते सध्या बातम्यांमध्ये चर्चेत आहेत. अगदी ट्विटर खरेदीचा निर्णय घेऊन ती प्रक्रिया पार पडेपर्यंतही या प्रकरणात काही ट्विस्ट बघायला मिळाले. ट्विटरच्या खरेदीनंतर अल्पावधीतचं इलॉन मस्क यांनी मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली. यातला एक मोठा निर्णय म्हणजे कर्मचारी कपात. अगदी सीईओ पद देखील यातून सुटले नव्हते. ट्विटरचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिने हा मोठा निर्णय होता.
एकीकडे कर्मचारी कमी करून खर्चात कपात तर दुसरीकडे ट्विटरच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी व्हेरिफाईड अकाउंटवरील ब्ल्यू-टीक पेड केली. अशा या निर्णयातून मस्क हे ट्विटर दिवाळखोरीत जाईल, असे संकेत देत होते.
बाजारात ट्विटरची पत खालावत चालल्याचे अनेक गोष्टी सूचित करत आहेत. मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने, दरम्यान, अलीकडेच ट्विटरचे क्रेडिट रेटिंग कमी केले. गुंतवणूकदार आणि क्रेडिट रेटिंग एजन्सीचा विश्वास कमी होतं आहे. द इन्फॉर्मेशन अँड प्लॅटफॉर्मरने ट्विटरच्या दिवाळखोरीबद्दलचे विधान यापूर्वीचं केले आहे.
टेस्लावर आणि वैयक्तिक संपत्तीवरही परिणाम
इलॉन मस्कच्या यांच्या बेधडक निर्णयांचा टेस्ला आणि त्यांची वैयक्तिक संपत्तीवरही परिणाम होते असल्याचे स्पष्ट झाले आहे. टेस्लाच्या शेअरची घसरण झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत 200 बिलियन डॉलर्सनी घट झाली होती. मस्कच्या आक्रमक भूमिकेने गुंतवणूकदार घाबरत असल्याचा निष्कर्ष वेळोवेळी काढण्यात आला आहे.
मस्क यांना ट्विटरचे नक्की करायचे तरी काय आहे?
ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक पेड करण्याचा इलॉन मस्कचा निर्णयही अनेकांना रुचला नव्हता. त्याचबरोबर अचानक एवढी मोठी कर्मचारी कपात केल्यामुळे मस्कला ट्विटरचे नक्की करायचे काय आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आता ट्विटरचा खर्च आणि दिवाळखोरी याबाबत मस्कने जे सूचित केले आहे, त्यावरुन तो आता कोणता नवीन मोठा निर्णय घेणार आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.