एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा (Twitter) ताबा घेतल्यापासून यूझर्सना धास्ती वाढलीय. आपला कंटेंट शेअर करणं तसंच व्हेरिफाइड अकाउंट या यूझर्सशी थेट संबंधित बाबी आहेत. यावर अनेक निर्बंध आल्याची भावना यूझर्समध्ये आहे. यात प्रामुख्यानं ब्लू टिकसाठी (Blue tick) पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा मस्क यांनी केली. म्हणजेच ब्लू टिक आता सशुल्क झालीय. तर असे व्हेरिफाइड अकाउंट (Verified account) असणाऱ्या यूझर्सना ट्विट करण्याची शब्दमर्यादाही वाढवलीय. इतर सामान्य यूझर्स थ्रेटस्वरुपात ट्विट करू शकतात. इतरही अनेक बदल केले. त्यामुळे ट्विटरचं मूल्य मात्र घसरल्याचंच दिसून येतंय.
Table of contents [Show]
कंटेंट मॉडरेशनमध्ये मोठे बदल
मस्क यांनी कंटेंट मॉडरेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यामुळे जाहिरातदार घाबरले. त्याचा कंपनीच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला. कंपनीचं सध्याचं मुल्य 20 अब्ज डॉलर आहे. तर प्रतिस्पर्धी असलेल्या स्नॅपचॅट (Snapchat) 18.2 बिलियन, सोशल नेटवर्क आणि क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म असलेल्या पिन्टरेस्ट (Pinterest) या कंपनीचं मूल्य 18.7 बिलियन डॉलरपेक्षा काहीसं जास्त आहे.
कर्मचारी कपात
एलन मस्क यांनी मागील वर्षापासून साडे तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. मागच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023मध्येही जवळपास 200 जणांना घरी पाठवण्यात आलं. येत्या काळात आणखी कर्मचारी कपात होण्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही घबराटीचं वातावरण आहे.
ब्लू टिकची सर्वाधिक चर्चा
ब्लू टिक हा विश्वासार्हतेचा एक मार्ग आहे. सेलिब्रिटी, पत्रकार, राजकारणी, विविध संस्थांमधील प्रसिद्ध व्यक्ती यांच्यासाठी हा एक चांगला मार्ग होता. काही बाबींची पूर्तता केल्यानंतर यूझर्सला ब्लू टिक मिळत होती. मात्र एलन मस्क यांनी हीच ब्लू टिक सशुल्क केलीय. त्यासाठी पॅकेजेसची घोषणाही त्यांनी केली. आधी केवळ ब्लू टिक उपलब्ध होती. आता विविध रंगांच्या टिक उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठीचं सबस्क्रिप्शनही जाहीर करण्यात आलंय.
1 एप्रिलपासून हटवणार ब्लू टिक
मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होणारी ब्लू टिक अखेर एक एप्रिलपासून हटवली जाणार आहे. तर आताची आणि नवीन येणारी टिक यासंबंधीचे बदलही सांगितले जाणार आहेत. भारतीय यूझर्सना महिन्याला सरासरी 650 रुपये यासाठी भरावे लागणार आहेत. वर्षाचं सबस्क्रिप्शनही उपलब्ध असणार आहे. त्याचं मूल्य सरासरी 6,800 रुपये असेल. यामुळे मासिक रुपये 566पर्यंत कमी होईल. जुन्या ब्लू टिक एक एप्रिलपासून हटवण्यास सुरुवात होईल आणि सबस्क्रिप्शननुसार नव्या रंगाची टिक यूझर्सला दिली जाणार आहे. त्यामुळे जुनी ब्लू टिक काढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं एलन मस्क यांनी आधीच स्पष्ट केलंय.
Any individual person’s Twitter account affiliated with a verified organization is automatically verified https://t.co/5j6gx6UKHm
— Elon Musk (@elonmusk) March 24, 2023
कोणाला कोणती टिक?
आतापर्यंत व्हेरिफाइड असलेल्या सर्वच यूझर्सना ब्लू टिक मिळत होती. आता विविध रंगांच्या टिक उपलब्ध असणार आहेत. पर्सनल अकाउंट असणाऱ्यांना निळ्या रंगाची (ब्लू टिक) असणार आहेत. कंपन्या आणि एनजीओजना सोन्याची (गोल्डन टिक) मिळणार आहे. तर सरकार किंवा त्यांच्या कर्मचारी-प्रतिनिधींना ग्रे टिक (करड्या रंगाची टिक) मिळणार आहे.