ट्विटर (Twitter Inc) या सोशल मीडिया (Social Media Platform) कंपनीचे मालक आणि अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचं पुन्हा एकदा जाहीरपणे म्हटलं आहे. किंबहुना हे सांगण्यासाठीच एका ट्विटर स्पेसमध्ये (Twitter Space) ते सहभागी झाले होते. आणि त्यांनी सांगितलं की, ‘कंपनीकडे आता फक्त 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकेच रोख पैसे आहेत!’
मे 2022 पासून कंपनीची अवस्था बिकट होत गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मागचे काही आठवडे आपण फक्त कंपनी चालवण्याचा खर्च कसा कमी करता येईल याचाच विचार करत आहे, असंही मस्क यावेळी बोलताना म्हणाले.
याच आठवड्याच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्विटरवर एक पोल (Twitter Poll) घेतला होता. आणि त्यात आपण ट्विटरच्या सीईओ पदावर राहू की नको राहू असा प्रश्नच ट्विटर वापरणाऱ्यांना विचारला. लोकांनी त्यांच्याविरोधात कौल दिला.
हे सगळं नाट्य घडल्यानंतर मस्क यांनी ही ट्विटर स्पेस घेतली. हे टायमिंगही याममध्ये महत्त्वाचं मानलं जातंय. स्पेसमध्ये बोलताना मस्क म्हणाले, ‘एक कंपनीचा मालक आणि अध्यक्ष म्हणून माझी बाजू समजून घ्या. ट्विटर कंपनी एका विमानासारखी आहे, जिचं जमिनीवर क्रॅश लँडिंग झालंय. आणि इंजिनाला आग लागलीय.’
ट्विटरमध्ये काय घडतंय? What's Going on at Twitter?
ऑक्टोबर 2022 मध्ये मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा आपल्याकडे घेतला. पहिल्याच दिवशी मस्क यांनी कार्यालयात घेतलेली एन्ट्रीही गाजली होती. ते हातात एक कमोड घेऊनच आले. आणि जुन्या अनेक गोष्टी ते धुवून टाकणार ही त्यांची रणनिती या कृतीतून त्यांनी स्पष्ट केली.
त्यानंतर एका रात्रीत कर्मचारी कार्यालयातही नसताना त्यांनी कंपनीत मोठी नोकर कपात केली. उर्वरित कर्मचाऱ्यांशी झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी इशारा दिला तो दिवाळखोरीचा. ‘जर ट्विटरने येणाऱ्या दिवसांत पैसे उभे केले नाहीत, तर आपल्याला दिवाळखोरीच्या मार्गाने जावं लागेल,’ असं ते म्हणाले.
पण, पैसे गोळा करण्यासाठी मस्क यांनी उचललेली पावलंही लोकांच्या पचनी पडली नाहीएत. बाहेरच्या गुंतवणुकदारांकडून तर त्यांनी पैसे मागितलेच. त्यासाठी त्यांनी गुंतवणुकीची ऑफरही त्यांनी दिली. पण, त्याचबरोबर ट्विटर वापरणाऱ्यांसाठीही त्यांनी ब्लूट्विटर हे फिचर पैसे देऊन मिळणार असल्याचं जाहीर केलं. त्यातही अनेक वाद निर्माण झाले. ट्विटरमध्ये मस्क यांनी केलेले बदल नियमितपणे ट्विटर वापरणाऱ्या आणि मस्क यांना पाठिंबा असलेल्या लोकांनाही रुचले नाहीत.
याचंच पर्यवसान मस्क यांनी ट्विटर सोडण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावात झालं. ट्विटर ताब्यात घेतल्यापासून मस्क यांचं टेस्ला या मुख्य कंपनीतही लक्ष नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मस्क यांची वैयक्तिक मालमत्ताही कमी झाली आहे.