नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार, दुचाकी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Electric vehicle price hike) डिसेंबर महिन्यात आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या किमतीत नवीन वर्षात वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहने सुमारे १५ टक्क्यांनी पुढील वर्षात महाग होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या बॅटरीच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे सहाजिकच कारची किंमत वाढेल. EV कार निर्मिती कंपन्यांना सरकारच्या अनेक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळेही एकूण वाहन निर्मितीची खर्च वाढतो.
सुरक्षा मानकांमध्ये वाढ
इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारने अलीकडेच बॅटरीसाठी सुधारित चाचणी मानके लागू केली आहेत. त्यामुळे तुम्ही जर तुम्ही पुढील आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ज्यादा रक्कम मोजावी लागू शकते. सोबतच कार निर्मिती करताना कच्च्या मालाला किंमती आणि निर्मिती साखळीतील खर्चही महागाईमुळे दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे देखील किंमती वाढणार आहेत.
बॅटरीच्या किंमतीत वाढ होणार
बाजारात बर्याच स्वस्त आणि कमी दर्जाच्या बॅटरी आल्या असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अडचणीत आहे. नवीन मानकांनुसार, बॅटरी उत्पादन आणि वापरामुळे बॅटरीच्या किमतींमध्ये नक्कीच वाढ होईल. सेफ्टी व्हॉल्व्ह, तापमान सेन्सर, बीएमएस यासारखे काही महत्त्वाचे घटक किंवा भाग बॅटरीमध्ये जोडले जातील. त्यामुळे अनेक बॅटरी उत्पादकांच्या कच्च्या मालाची किंमत वाढेल. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये उतरत असल्या तरी विश्वासार्हता निर्माण करण्यात यातील किती कंपन्या यशस्वी ठरतील, ते येत्या काळात दिसून येईल.
इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना -
इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर त्यामध्ये सुरक्षा विषयक अनेक त्रुटी दिसून आल्या. वाहन चालवत असताना आग लागण्याच्या घटना दुचाकी आणि कारच्या बाबतीतही घडल्या. अनेक कंपन्यांनी काही गाड्या माघारी बोलावून घेतल्या. त्यामुळे या वाहनांबाबत नागरिकांमध्ये गैरसमजही निर्माण झाले. त्यामुळे सरकारने वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी कडक नियमावली तयार केली आहे. नवीन बॅटरी सुरक्षा नियम दोन टप्प्यांत वाढवण्यात आले आहेत, त्यापैकी पहिला 1 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आला आणि दुसरा 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल.