Table of contents [Show]
ईडीचं सविस्तर निवेदन
अंमलबजावणी संचालनालय विविध ठिकाणी धाडी टाकत बेनामी संपत्ती ताब्यात घेत आहे. असंच एक प्रकरण हरयाणाच्या गुरुग्राममधून समोर आलंय. रियल्टी फर्म युनिटेक आणि तिच्या प्रवर्तकांच्या विरोधात ईडीनं कारवाई केलीय. चौकशी करून गुरुग्राममध्ये 245 कोटी रुपयांच्या 15 जमीन पार्सल ताब्यात घेतले आहेत. खरं तर या स्थावर मालमत्ता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या म्हणजेच पीएमएलए (PMLA) या कलमांच्या अंतर्गत जप्त केल्या होत्या. हे प्रकरण पीएमएलए कोर्टात गेलं. तिथे न्यायनिर्णय प्राधिकरणानं या सर्व प्रकरणाची पुष्टी केली. अखेर ईडीनं या जमिनीच्या पार्सलचा भौतिक ताबा आता घेतला आहे. यासंबंधीचं सविस्तर निवेदनही ईडीनं काढलंय. पीटीआयनं यासंबंधीचं वृत्त दिलंय.
दोन आरोपपत्रे दाखल
युनिटेक समुहातील बंधू संजय चंद्रा आणि अजय चंद्रा तसंच त्यांचं कुटुंब आणि इतरांविरुद्ध खटला दाखल करण्यात आलाय. मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) अनेक एफआयआय नोंदवले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणी ईडीनं चंद्रा बंधू, त्यांचे वडील रमेश चंद्रा, संजय चंद्राची पत्नी प्रीती चंद्रा, आरोपी कंपनी कार्नोस्टी समूहाचे प्रवर्तक राजेश मलिक यांना अटक करण्यात आलीय. रमेश चंद्रा हे संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांचे वडील असून युनिटेकचे संस्थापक आहेत. एकूण 1,132.55 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय. यासह दोन आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
एकूण मूल्य 1, 132.55 कोटी
जप्त केलेल्या मालमत्तेचा विस्तारही मोठा आहे. या मालमत्तेच्या जप्तीमध्ये कार्नोस्टी ग्रुप, शिवालिक ग्रुप, त्रिकर ग्रुप आणि चंद्रांच्या शेल, बेनामी आणि वैयक्तिक कंपन्यांचा समावेश आहे, असं ईडीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तात्पुरत्या 16 संलग्नक आदेशांद्वारे ईडीनं विविध देशांतर्गत आणि परदेशातल्या त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तांचं एकूण मूल्य 1, 132.55 कोटी असल्याचं समोर आलंय.
भ्रष्टाचारासह विविध कलमं
ईडीनं दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा आणि साकेत पोलीस स्टेशन, नवी दिल्ली आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे (सीबीआय) एफआयआरच्या दाखल केला. त्या आधारे 6 जून 2018 रोजी युनिटेक समूहाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातली विविध कलमं या प्रकरणात लावण्यात आली आहेत.