अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकांचा सोने (Gold) खरेदीकडे ओढा असतो. मात्र अनेकजण ते केवळ साठवून ठेवतात. याचा उपयोग गुंतवणूक म्हणून करता येवू शकतो. आपल्या घरात किंवा बँक लॉकरमध्ये न वापरलेलं सोनं जोखीममुक्त उत्पन्न मिळवण्यासाठी वापरता येवू शकतं. बाजारातल्या जोखमीपासून बचाव करण्याच्या उद्देशानं सोन्यातली गुंतवणूक फायद्याची मानली जाते. हे सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) सरकारच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत जमा करा. यामुळे तुम्हाला निश्चितच अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
Table of contents [Show]
काय आहे सुवर्ण मुद्रीकरण योजना?
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सरकारची ही एक योजना आहे. सुवर्ण मुद्रीकरण योजना किंवा सुधारित सुवर्ण ठेव योजना (R-GDS) ही एक सुवर्ण मुदत ठेव योजना आहे. वापरात नसलेलं सोनं ग्राहक आर-जीडीएस योजनेअंतर्गत जमा करू शकतात. या माध्यमातून जोखीममुक्त व्याज मिळू शकतं. त्यांना त्यांच्या सोन्याच्या ठेवींवर कर्जही मिळू शकतं. या योजनेनुसार, पात्र ठेवीदार कोणत्याही नियुक्त बँकेच्या शाखेत आपलं सोनं ठेव खातं उघडू शकतो. भारतातले रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), मालकी आणि भागीदारी संस्था असे या योजनेसाठी पात्र ठेवीदार ठरतात.
शुद्धता तपासणार
या योजनेनुसार ठेवीदार सोनं, दागिनं, नाणी जमा करू शकतात. ठेवीदारांना सुवर्ण ठेव योजनेत सहभागी व्हायचं असेल तर स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्र जमा करावी लागतील. त्याचबरोबर अटी व शर्तींची एक मंजूर प्रत सादर करावी लागेल. साधारणपणे, जे सोनं ठेवीमध्ये असणार आहे, त्या सोन्याची शुद्धता तपासली जाईल. त्यानंतर या योजनेनुसार सोन ठेवता येणार आहे.
व्याज दर
सोनं ठेव योजनेचे साधारणपणे तीन प्रकार सध्या उपलब्ध आहेत. 12-15 वर्षांसाठी तुम्ही सोनं ठेवल्यास तुम्हाला कमाल 2.5 टक्के व्याजदर मिळू शकतो. या कार्यकाळासाठी लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असेल. पाच ते सात वर्षांच्या ठेवीच्या या कालावधीसाठी व्याज दर वर्षी 2.25 टक्के असणार आहे. तिसरा कार्यकाळही उपलब्ध आहे, एक ते तीन वर्षांचा. यानुसार ठेवीदाराला वार्षिक 0.50-0.60 टक्के व्याजदर मिळतं. ठेवीदाराला दर वर्षी 31 मार्चला व्याज भरायचं आहे की व्याज चक्रवाढ आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळवायचं आहे हे निवडता येवू शकतं.
मर्यादा किती?
या योजनेनुसार सोन्याच्या ठेवीसाठी जास्तीत जास्त मर्यादा नाही. मात्र कमीत कमी 10 ग्रॅम सोनं ठेवण्याची अट आहे. सोन्याच्या ठेवींमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नातून स्रोतावर (टीडीएस) कोणताही कर कापला जात नाही. रुपयात किंवा सोन्याच्या पट्टीत ठेवीदाराला परतफेड हवी असेल तर तशी निवड करण्याचा ठेवीदाराला अधिकार आहे.
जमा करण्याची प्रक्रिया
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वेबसाइटनुसार, ग्राहकांना त्यांच्या बार, नाणी आणि दागिन अशा सोन्याच्या वस्तू, दगड आणि इतर धातू वगळता एमएमटीसी-पॅम्प (MMTC-PAMP) किंवा सरकारी मिंट मुंबईच्या कोणत्याही बँक-मंजूर सीपीटीसीमध्ये जमा करणं गरजेचं आहे. आगीच्या माध्यमातून सोन्याची पारख केली जाते.
शुद्धता प्रमाणपत्र
सीपीटीसी/रिफायनर्सवर सोनं डिलिव्हर केल्यावर सोन्याची शुद्धता आणि वजन तपासण्यासाठी 995 सूक्ष्मता शुद्धतेमध्ये ते वितळवलं जाईल आणि बारमध्ये रूपांतरित केलं जाईल. त्यानंतर ठेवीदाराला शुद्धता आणि प्रमाण असलेलं प्रमाणपत्र दिलं जाईल. ठेवीदारानं हे प्रमाणपत्र नियुक्त शाखेत अर्ज, स्वीकृत अटी व शर्ती तसंच इतर कागदपत्रांसह सोने ठेव प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मुंबईतल्या नोडल शाखेत सादर करणं गरजेचं आहे. यात सोन्याचं प्रमाण, वजन नमूद असायला हवं. मुंबईतली शाखा यासंबंधीचं प्रमाणपत्र जारी करून ग्राहकांना पाठवेलं.