भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरदारवर्ग पाहायला मिळत आहेत. पूर्वी लोक वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नोकरी करत होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात हे प्रमाण कमी होताना दिसत आहे. प्रवासाची दगदग, कामासंदर्भातील वाढता मानसिक ताण लक्षात घेता लोकांना हृदयविकार, ब्लडप्रेशर, मधुमेह (डायबिटीस) यासारख्या आजारांचा सामना करावा लागतोय. त्यातच अलीकडच्या काही वर्षात नोकरी ऐवजी उद्योगधंदा करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामुळे जर तुम्हीही लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण अशा काही 5 बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हीही तुमच्या निवृत्तीचे नियोजन लवकर करू शकाल.
Table of contents [Show]
लवकर निवृत्त व्हायचं असेल, तर 'या' 5 गोष्टी जाणून घ्या
बजेट प्लॅन करा
जर तुम्हालाही नोकरीतून लवकर निवृत्त व्हायचे असेल, तर त्यासाठी काही गोष्टी ठरवणे गरजेचे आहे. तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी निवृत्त होणार आहात किंवा आजपासून किती वर्षांनी निवृत्त होणार आहात, हे सर्वप्रथम ठरवावे लागेल. त्यानुसार आर्थिक नियोजन (Financial Planning) करून तुमच्या सध्याच्या गरजा आणि त्यासाठी येणारा मासिक खर्च लक्षात घ्या. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला मासिक खर्च किती येऊ शकतो? याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करा. त्यानुसार तुम्हाला आर्थिक तरतूद देखील करावी लागेल. जेणेकरून निवृत्तीनंतर तुम्ही टेन्शन-फ्री लाईफ जगू शकता.
आर्थिक उत्पन्नाचे इतर सोर्स तयार करा
नोकरी करत असताना आपल्याला महिन्याला ठराविक रक्कम मिळत असते. ज्यातून आपला मासिक खर्च चालतो, मात्र निवृत्तीनंतर तसे होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या निवृत्तीनंतरची तरतूद स्वतःच करायला हवी. कामातून निवृत्ती घेण्यापूर्वी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधायला आणि वाढवायला हवेत. जसे की एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे. ज्यातून तुम्हाला निवृत्तीनंतरही उत्पन्न मिळत राहील. थोडक्यात काय तर, निवृत्तीनंतर उत्पन्न न थांबता तुम्हाला आरामात चांगले आयुष्य जगता येईल.
निवृत्तीनंतर आपल्याकडे ठराविक रकमेचा फंड (Fund) असणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात आपल्याला या फंडची मदत होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे हा फंड तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणे गरजेचे आहे; जो ऐनवेळी काढता येऊ शकतो आणि त्यावर तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. हा फंड मोठ्या रकमेचा असावा आणि तो एकाच ठिकाणी गुंतवण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणे कधीही उत्तम.
कर्जाची परतफेड लवकर करा
तुम्हाला लवकरात लवकर निवृत्त व्हायचे असेल, तर तुम्ही घेतलेले कर्ज (Loan) लवकरात लवकर फेडा. लोक मोठ्या प्रमाणावर गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्ज घेतात. गृहकर्जाचा कालावधी हा दीर्घकाळ असतो. त्यामुळे घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडा. जेणेकरून तुम्ही कर्जाच्या कचाट्यातून लवकर सुटू शकता. गृहकर्जाशिवाय इतर घेण्यात आलेली कर्जे, जसे की वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज शक्य तितक्या लवकर फेडा आणि जास्तीत जास्त पैसे भविष्यातील वाटचालीसाठी गुंतवा. हीच गुंतवणूक पुढे जाऊन मोठा आर्थिक निधी उभारण्यास मदत करेल.
योग्य ठिकाणी गुंतवणूक करा
जर तुम्हाला लवकरात लवकर निवृत्त व्हायचे असेल, तर तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. निवृत्तीसाठी पैशांची बचत ही करायलाच हवी. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केलेली गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. यासाठी गुंतवणुकीत विविधता असायला हवी. गुंतवणूक ही फक्त बँकेच्या मुदत ठेवी पुरती मर्यादित न ठेवता, म्युच्युअल फंड, शेअर्स, पोस्टातील योजना, सोने आणि रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या ठिकाणी असायला हवी. जितकी जास्त गुंतवणूक तितके जास्त फायदे हे समीकरण लक्षात ठेवायला हवे.