गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडतो आहे. दिल्लीतील सामान्य जनजीवन पावसामुळे, पुरामुळे कमालीचे प्रभावित झाले आहे. दिल्लीतील सखल भागात पाणी साचल्यामुळे आणि यमुना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. याचा थेट परिणाम आता दिल्लीतील बाजारपेठांवर पहायला मिळतो आहे. दिल्लीत पाऊस आणि पुरामुळे सुमारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रभावित झाल्याची माहिती चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (सीटीआय) जाहीर केली आहे. यात छोट्या मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते आहे.
यमुना नदीतील पाण्याची वाढती पातळी पाहता सीटीआयने व्यापाऱ्यांना पुढील काही दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे सामानाचे नुकसान देखील झाले आहे. दुकान मालकांना याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जुनी दिल्ली, मोरी गेट, काश्मिरी गेट, चांदणी चौक, मठ मार्केट, जामा मशीद, खारी बावली येथील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
मसाला मार्केटचे नुकसान!
जुन्या दिल्लीतील खारी बावली हा परिसर आशिया खंडातील सर्वात मोठी मसाल्याची बाजरपेठ म्हणून ओळखला जातो. देशोविदेशातून लोक या मुघलकालीन बाजारपेठेत मसाला खरेदीसाठी येत असतात. दिल्लीतील पुरामुळे या बाजारपेठेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मसाला व्यापाऱ्यांचा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
बाजारपेठा बंदच!
सध्या दिल्लीत आपत्ती व्यवस्थापनाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पुराचे पाणी ओसरेपर्यंत लजपत राय मार्केट, किनारी बाजार, फतेहपुरी, खारी बाओली, नया बाजार या बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत. पुरामुळे नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात विस्थापन झाल्यामुळे त्यांचे देखील बचावकार्य सुरु आहे. दिल्लीतील जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत दिल्लीतील महत्वाच्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. आता पर्यंत जवळपास 200 कोटींचे नुकसान झाले असून, लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर न आल्यास आणखी नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
सीटीआयनुसार, रेवाडी, गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, मेरठ, सोनीपत, पानिपत, पलवल, बागपत, बरौत, मुझफ्फरनगर इत्यादी शहरांमधून दररोज दोन लाख ग्राहक दिल्लीत खरेदीसाठी येत असतात. पावसामुळे आणि पुरामुळे दळणवळण देखील बंद पडले आहे.