महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आता टीव्ही पाहण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 पासून देशात डीटीएच सेवा (DTH) आणि केबल सेवेचा दर 30% ने वाढणार आहे. दूरसंचार नियामकाने (TRAI) या दरवाढीला परवानगी दिली आहे. मात्र या दरवाढीला केबल टीव्ही ऑपरेटर्सनी विरोध केला आहे. ट्रायच्या नव्या दर पत्रकाविरोधात ऑपरेटर्स न्यायालयात गेले आहेत.
कोरोना टाळेबंदीमध्ये थिएटर बंद असल्याने OTT प्लॅटफॉर्म्स प्रचंड विस्तारले होते. यामुळे डीटीएच आणि केबल इंडस्ट्रीला देखील फटका बसला होता. आता डीटीएच आणि केबलचा दर वाढवल्यासे ग्राहकांना गमावण्याची चिंता डीटीएच आणि केबल ऑपरेटर्सना सतावत आहे. नोव्हेंबर महिन्यात दूरसंचार नियामकाने डीटीएच आणि केबल सेवांचे नवे दर पत्रक जारी केले होते. त्यानुसार टीव्ही चॅनलसाठी नवीन किमान दर 12 रुपयांवरुन 19 रुपये इतका करण्यात आला होता. आता नवीन दर प्रणाली फेब्रुवारी 2023 पासून लागू केली जाणार आहे.
डीटीएच आणि केबल भाडेवाढीसंदर्भातील एक याचिका केरळ हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारी 2023 रोजी या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. केबल टीव्ही ऑपरेटर्सचा या भाडेवाढीला विरोध आहे. ग्राहकांना परवडेल असे दर जोपर्यंत अंतिम होत नाहीत तोवर ट्रायच्या नव्या दर पत्रकाची अंमलबजावणी करता येऊ नये, अशी भूमिका केबल टीव्ही ऑपरेटर्सने घेतली आहे.
दरम्यान, ट्रायकडून मात्र नव्या दर पत्रकाचे समर्थन करण्यात आले आहे. यात ट्रायने असा दावा केला आहे की नव्या दर पत्रकामुळे केबल किंवा डीटीएच सेवा घेणाऱ्या ग्राहकांची 40 ते 50 रुपयांची बचत होणार आहे. नव्या दर पत्रकात नेटवर्क कपॅसिटी फी (NCF) ही कमाल 130 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किंमतीत ग्राहकांना आता 228 चॅनेल्स पाहता येतील. पूर्वी या शुल्कात 100 चॅनेल्स मिळत होती. याशिवाय एकाच घरात दोन टीव्ही कनेक्शन असल्यास त्या ग्राहकाला नेटवर्क कपॅसिटी फीमध्ये दुसऱ्या टीव्ही कनेक्शनसाठी केवळ 60% शुल्क भरावे लागणार आहे.