महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून 80 कोटी रुपयांची मोबाइल उपकरणे, ई-सिगारेट, ब्रँडेड बॅग आणि उपकरणे जप्त केली आहेत. सोमवारी ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांना अटक करण्यात आली आहे.
या वस्तूंची तस्करी कपडे आणि महिलांच्या पादत्राणांच्या खेपेत करण्यात आली होती ज्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही खेप आयात करणाऱ्याचा नोंदणीकृत पत्ता न सापडल्याने तोही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. डीआरआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना गुप्तपणे चीनमधून महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. एसईजेच्या माध्यमातून हा माल बाहेर नेला जात होता. ज्या सहा कंटेनरमध्ये हा माल आणला होता त्यांचीही ओळख पटली आहे.
डीआरआयने अॅपलच्या एअरपॉड्सचे 33,138 नग, बॅटरी, 4,800 ई-सिगारेट, 7.11 लाख मोबाइल उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, 29,077 ब्रँडेड बॅग, शूज आणि कॉस्मेटिक वस्तू, 53,385 ब्रँडेड घड्याळे, 58,927 ऑटोमोबाईल पार्ट्स जप्त केले आहेत.आयात केलेल्या मालाची किंमत 1.5 कोटी रुपये घोषित करण्यात आली, तर जप्त केलेल्या मालाची किंमत 80 कोटी रुपये आहे. बनावट आयातदारांच्या नावाने महागड्या मालाची तस्करी करणारे सिंडिकेट कार्यरत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.