Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

International Women Day 2023: 108 पैकी फक्त 17 युनिकॉर्नमध्ये महिलांचा सहभाग; महिलांना भांडवलाची चणचण!

Successful unicorn women entrepreneurs

International Women Day 2023: महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी आज भांडवल मिळवण्यात अडचणी येत आहेत. मार्केटमध्ये उद्योग-धंदा सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या एकूण भांडवलापैकी अगदीच थोडासाच भाग महिला उद्योजकांच्या वाट्याला येत आहे. यातील बराचसा भाग हा पुरुषांच्या वा़ट्याला जात आहे.

World Women Day 2023: आज जागतिक महिला दिन. महिलांनी अनेक वेगवेगळ्या वाटा चोखाळून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. अगदी उद्योग क्षेत्रातही महिलांनी मोठी कामगिरी केली आहे. भारतातील महिलांनी सुरू केलेल्या उद्योगांच्या पार्श्वभूमीवर आज भारतातील एकूण 108 युनिकॉर्नपैकी 17 युनिकॉर्न कंपन्यांची सुरूवात फाऊंडर आणि को-फाऊंडर म्हणून महिलांनी केली. यामध्ये बायजू, नायका, बिगबास्केट, मम्माअर्थ, लेन्सकार्ट, मोबिविक आदी कंपन्यांचा समावेश आहे. पण तरीही आज महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल मिळवण्यात अडचणी येत आहेत. 

भारतातील 108 युनिकॉर्नपैकी 17 युनिकॉर्न या प्रत्यक्ष महिलांनी सुरू केल्या आहेत. तर काही महिला त्याच्या सह-संस्थापक आहेत, अशी माहिती ट्रॅक्सन (Tracxn)च्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. कलारी कॅपिटलने मंगळवारी (दि. 7 मार्च) प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, महिलांना उद्योगाच्या भांडवलासाठी लिमिटेशन्स आहेत. म्हणजे उद्योग-धंदा सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या एकूण भांडवलापैकी अगदीच थोडासा भाग महिला उद्योजकांच्या वाट्याला येत आहे. उदाहरणार्थ भांडवली गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये 100 रुपये उपलब्ध असतील तर फक्त महिला उद्योजकांना 1 रुपयांपेक्षा कमी निधी मिळत आहे. त्याच जागी पुरूष आणि महिला यांना एकत्रितरीत्या 100 रुपयांतील 9 रुपये आणि पुरूष व्यावसायिकांना 100 रुपयांतील 90 रुपये मिळत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.


उद्योग महिलांचे क्षेत्र नाही का?

आज असे कोणते क्षेत्र नाही. जिथे महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. पण तरीही काही क्षेत्रांमध्ये महिलांना त्याप्रमाणे सन्मान किंवा वागणूक मिळत नाही. उद्योग क्षेत्रातही अनेक महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकले आहे. पण अजूनही पुरुषांइतका विश्वास महिला उद्योजकांवर ठेवला जात नसल्याचे या अहवालामधून दिसून येते.

कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांनी सांगितले की, आजही महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी निधी देताना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, त्यांच्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी, त्यांना मिळत असलेले समर्थन या गोष्टींचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुष असा लिंग भेद केला जात नसला तरी, महिलांना अजूनही विश्वास संपादन करून घेण्यासाठी झगडावे लागत आहे. जसे की एखाद्या व्यवसायाची माहिती देताना किंवा त्यासाठी निधी मागताना तिथे पुरुष असेल तर महिला संकोचतात. पण त्याऐवजी तिथे महिलाच असेल तर , ती आत्मविश्वासाने तिच्या प्रोडक्टबद्दल नक्कीच खात्रीशीरपणे बोलू शकते, असे वाणी कोला यांना वाटते.  

भारतातील स्त्रियांवर वर्षानुवर्षे ठराविक पद्धतीने संस्कार केले जात आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी पडत आहे. स्त्रिया या ज्याप्रमाणे कुटुंबाची काळजी घेऊ शकतात तितक्या जबाबदारीने त्या व्यावसायही करू शकतात. याची जाणीव महिलांना करून देणे गरजेचे आहे, असे मत बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी व्यक्त केले.

ट्रॅक्सनने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये अनेक महिलांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना भांडवल मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न सोडून दिला. यावर आरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी असे म्हटले आहे की, सरकारकडे पुरेसा निधी आहे. सरकारने तो निधी सिडबी (Small Industries Development Bank of India-SIDBI) सारख्या संस्थेची स्थापना करून फक्त महिलांना यातून भांडवल उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून महिलांना भांडवल मिळवण्यासाठी विशेष धडपड करावी लागणार नाही. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ज्यातून महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करतील. सरकारने महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करून प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करून त्यांना बक्षिसरूपात मोठे भांडवल उभे करून द्यावे. जेणेकरून त्या त्यातून व्यवसाय सुरू करतील.  

फक्त दोन युनिकॉर्न कंपन्यांच्या सीईओपदी महिला 

सध्याच्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये नायका आणि ऑक्सिझो (Nykaa & Oxyzo) या दोनच युनिकॉर्न कंपन्या आहेत. ज्यांचे सीईओ पद महिलांकडे आहे. त्या महिला अनुक्रमे फाल्गुनी नायर आणि रुची कालरा या आहेत. ज्या कंपन्यांचे भांडवल 1 बिलिअन डॉलरपेक्षा जास्त आहे. अशी इतर कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी पदावर महिला नाहीत.