Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्हाला भारतीय शेअर मार्केटचा इतिहास माहितीये का?

History of Indian Share Market

स्टॉकच्या या देवाणघेवाणीला 18 व्या शतकापासून भारतात सुरूवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ही देवाणघेवाण कर्जाच्या स्वरूपात सुरु केली होती. त्यानंतर 1830 मध्ये मुंबईत किंवा त्यावेळच्या बॉम्बेमध्ये (Mumbai / Bombay) बँक आणि कापूस कंपन्यांच्या कॉर्पोरेट शेअर्सची देवाणघेवाण सुरु झाली.

आज निफ्टी (Nifty) किती वर आलाय ? आज मार्केट (Share Market) खूप पडलेलं दिसतंय ! अरे उगाच ते शेअर्स घेतले मोठा फटका बसला !! सेन्सेक्स (Sensex) चांगला परफॉर्म करतोय!! या गोष्टी सर्रास कानावर पडत असतात. ट्रेनमधून किंवा बसमधून प्रवास करताना लोकांचं लक्ष प्लॅटफॉर्म किंवा बसस्टॉप वर जेवढं असतं तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष निफ्टी आणि सेन्सेक्स (Nifty & Sensex)वर असतं. शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेणं आणि ते विकणं हे अगदी बोटावरील खेळासारखं झालं आहे. त्यामुळे सध्या आपल्या आजूबाजुला असलेल्या लोकांपैकी किमान लोक शेअर्समध्ये विक्री किंवा खरेदी करत आहेत. 

आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच शेअर मार्केटबद्दल उत्सुकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेअर मार्केट म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? यातून पैसे कसे कमावू शकतो? असे प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याआधी शेअर मार्केटचा इतिहास काय हे जाणून घेणं ही तितकंच रंजक आहे. चला तर जाणून घेऊयात भारतातल्या शेअर मार्केटचा इतिहास.


स्टॉकस् म्हणजे एखाद्या कंपनीचा हिस्सा. अनेक स्टॉक एकत्र केल्यानंतर त्याला शेअर्स, असं म्हटलं जातं. जो व्यक्ती कंपनीचे शेअर्स विकत घेतो; तो त्या कंपनीच्या ठराविक हिश्याचा मालक होतो. स्टॉकच्या या देवाणघेवाणीला ट्रेडिंग असं म्हटलं जातं. जी सुमारे 18 व्या शतकापासून भारतात सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ही देवाणघेवाण कर्जाच्या स्वरूपात सुरु केली होती. त्यानंतर 1830 मध्ये मुंबईत किंवा त्यावेळच्या बॉम्बेमध्ये (Mumbai / Bombay) बँक आणि कापूस कंपन्यांच्या कॉर्पोरेट शेअर्सची देवाणघेवाण सुरु झाली. अनौपचारिकपणे मुंबईमध्ये पहिलं स्टॉक एक्सचेंज वडाच्या झाडाखाली 22 स्टॉक ब्रोकर्सद्वारे (Stock Brokers) सुरु करण्यात आले. 1850 मध्ये कंपनी कायदा आल्यानंतर लोकांचा कॉर्पोरेट भागीदारीत रस वाढू लागला. त्यामुळे अनेक ब्रोकर्स तयार होऊ लागले. नेटिव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन (Native Share & Stock Brokers Association) नावाच्या एका अनौपचारिक समूहाने 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange)ची स्थापना केली. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज (BSE is Oldest Stock Exchange in Asia) आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्मितीनंतर अनेक एक्सचेंजेस तयार होऊ लागली. 1894 मध्ये अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज (Ahmedabad Stock Exchange) जिथे कापड गिरण्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होत होती. 1908 मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंज (Calcutta Stock Exchange)मध्ये वृक्षारोपण आणि ताग गिरण्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होत असे, तर 1920 मध्ये मद्रास स्टॉक एक्सचेंज (Madras Stock Exchange) सुरू झालं.

स्वातंत्रानंतरचं मार्केट (Post Independence Market)

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होणारे व्यवहार वाढू लागले. वाढत्या व्यवहारांसोबतच घोटाळ्यांचे प्रमाण देखील वाढू लागले. त्यामुळे या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रकाची गरज भासू लागली. 1986 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजद्वारे संपूर्ण मार्केटचा आढावा सहजपणे घेता यावा म्हणून सेन्सेक्स (सेन्सिटिव्ह इंडेक्स) जारी केले. नियंत्रकाची वाढलेली गरज 1988 मध्ये सरकारद्वारे सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( Securities and Exchange Board of India-SEBI)ची स्थापना करून पूर्ण  केली. तर 30 जानेवारी, 1992 मध्ये सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीला वैधानिक मान्यता देण्यात आली. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पर्याय म्हणून दुसरे मोठे एक्सचेंज 1994 मध्ये स्थापन करण्यात आले. ज्याला आज आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) म्हणून ओळखतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 1994 पासून घाऊक कर्ज बाजार विभाग (Wholesale Debt Market Department) आणि इक्विटी विभाग (Equity Department) हे सुरु झाले. त्यानंतर 2000 मध्ये डेरिव्हेटिव्ह विभाग (Derivative Department) सुरु झाले. 1995 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टमचा वापर करू लागले. स्वातंत्रानंतर आतापर्यंत 23 नव्या स्टॉक एक्सचेंजेसची निर्मिती झाली. 

आजचे भारतीय मार्केट (Today’s Indian Market)

आजच्या घडीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) जगातील 11 व्या क्रमांकावरील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवलीकरण 1.7 ट्रिलियन डॉलर्स एवढे आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (National Stock Exchange) बाजार भांडवलीकरण  1.65 ट्रिलियन डॉलर्स एवढे आहे. आता नवनवीन अॅप्स आणि वेबसाईट्समुळे शेअर्सची खरेदी आणि विक्री करणं सोपं झालं आहे. कागदी स्वरूपात मिळणारे शेअर्स आता  डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. अनेक अॅप्स शून्य  ब्रोकरेज आणि इतर सुविधा पुरवितात. ज्यामुळे ट्रेडिंग अजून सोपे व आकर्षित झाले आहे.