Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market: ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी IRRA प्लॅटफॉर्म लाँच, जाणून घ्या कसा होईल फायदा

SEBI

Image Source : https://www.freepik.com/

सेबीद्वारे ट्रेडर्ससाठी Investor Risk Reduction Access (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक समस्या आल्यास ऑर्डरमधून बाहेर पडण्यासाठी याची मदत घेता येईल.

गेल्याकाही वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. खासकरून फ्यूचर अँड ऑपशन्समध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. बहुतांशजण ऑनलाइन ब्रोकरच्या माध्यमातून अनेक शेअर मार्केटमधील व्यवहार पूर्ण करतात. पण अनेकदा असे होते की ब्रोकरच्या प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक समस्या असल्याने व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही व मोठे नुकसान होते. यावर तोडगा म्हणून आता सेबीद्वारे Investor Risk Reduction Access (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. IRRA नक्की काय आहे व याचा ट्रेडर्सला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, त्याबाबत जाणून घेऊयात. 

इनव्हेस्टर रिस्क रिडक्शन अ‍ॅक्सेस (IRRA) प्लॅटफॉर्म काय आहे?

अनेकदा ब्रोकरच्या प्लॅटफॉर्ममध्ये समस्या असल्याने ट्रेडर्सला त्वरित व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही. अशावेळी ट्रेडर्सचे पैसे अडकून पडतात व वेळेवर स्क्वेअर ऑफ न केल्याने नुकसान देखील होते. अशावेळी IRRA प्लॅटफॉर्मचा उपयोग होईल.

IRRA प्लॅटफॉर्मला सेबीच्या मार्गदर्शनाखाली मार्केट इंफ्रास्ट्रक्चर इंस्टिट्यूशन्सद्वारे (MII) हाताळले जाईल. MII मध्ये BSE, NSE, MSE, MCX, NCDEX चा समावेश आहे. 

IRRA प्लॅटफॉर्मविषयी माधुरी पुरी बुच काय म्हणाल्या?

IRRA प्लॅटफॉर्मच्या लाँचवेळी सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बुच यांनी याचे महत्त्व अधोरेखित केले. बुच म्हणाल्या की, IRRA प्लॅटफॉर्म हा एकप्रकारे सुरक्षित जाळी सारखा आहे. याचा वापर करण्याची गरज पडायला नको; पण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांची पोझिशन सुरक्षित राहील याची काळजी घेणे हा आमचा उद्देश आहे.

यावेळी बोलताना बुच यांनी F&O ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत देखील मत व्यक्त केले. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.

IRRA प्लॅटफॉर्मचा ट्रेडर्सला कसा होईल फायदा?

IRRA प्लॅटफॉर्म कोणतीही समस्या असल्यास ट्रेडर्सचे नुकसान टाळण्यासाठी उपयोगी येईल. समजा, ट्रेडिंग करताना कोणतीही समस्या आल्यास अशावेळी ब्रोकर या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची सुचना देईल. प्लॅटफॉर्म ब्रोकरकडील सर्व ऑर्डर्स स्वतःकडे डाउनलोड करून घेईल. यानंतर गुंतवणूकदारांना मेसेज व ईमेलद्वारे याबाबतची माहिती दिली जाईल.

या मेसेज व ईमेलमध्ये लिंक देखील उपलब्ध असेल. या लिंकचा वापर करून ट्रेडर्स आपल्या ऑर्डर्समधून बाहेर पडू शकतात व यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. ब्रोकरद्वारे प्लॅटफॉर्मवर IRRA ची लिंक देखील उपलब्ध केली जाईल. ट्रेडर्स यूनिक क्लाइंट कोड व पॅन कार्डच्या मदतीने IRRA चा वापर करू शकतील.

लक्षात घ्या की, IRRA प्लॅटफॉर्मच्या मदतीने तांत्रिक अडचणीच्यावेळी केवळ जुन्या ऑर्डर्समधून बाहेर पडणे शक्य आहे. नवीन ऑर्डर देता येणार नाही.