प्रश्न – मी गेल्या एक वर्षापासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे.मात्र, यात सातत्याने नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन करावे.
महामनीचे उत्तर – मागील 4 ते 5 वर्षात भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, अनेकजण झटपट पैसे कमविण्याच्या नादात बाजारात उतरतात. यातील बहुतांशजण हे फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात. मात्र, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना संयम बाळगणे गरजेचे असते.
प्रसिद्ध फिनइन्फ्लूएंसर अंकुर वारिकू यांच्यामते, Risk can’t be eliminated. It can only be understood and managed.
म्हणजेच, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे असते. परंतु, योग्य रणनिती व उद्देश असल्यास तुम्ही नुकसान टाळू शकता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवायला व काय टाळावे? याविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
झटपट पैसे कमविण्याचा विचार सोडा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकजण झटपट पैसे कमविण्याच्या नादात लाखो रुपये गमवतात. फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणाऱ्या 10 पैकी 9 जणांचे नुकसान होते. त्यामुळे कधीही दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या.
समजा, तुम्हाला एखाद्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची आहे मात्र जास्त पैसे नाहीत, अशावेळी म्युच्युअल फंडचा देखील विचार करू शकता. तुम्ही अगदी 500 रुपयांपासून देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. लक्षात घ्या की, शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची यात त्वरित परतावा मिळणे अवघड असते. दीर्घकालीन उद्देशाने गुंवणूक केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
इतरांचे अनुकरण टाळा
अनेकदा आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांचा सल्ला घेतो व कोणत्याही कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. मात्र, इतरांचा सल्ला घेण्याच्या नादात तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. सर्वचजण एकाच कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतायत याचा अर्थ तुम्हीही तेच करायला हवे असे नाही.
शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असल्यास गर्दीचा भाग होणे टाळायला हवे. सल्ला सर्वांचा घ्या, परंतु गुंतवणूक करताना नेहमी स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला हवा. संपूर्ण अभ्यास करून विचारपूर्वक गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास जोखीम कमी होते.
स्टॉप लॉस फॉलो करा व वेळेत बाहेर पडा
तुमच्यासोबतही अनेकदा असे झाले असेल की एखाद्या स्टॉक्समध्ये नफा दिसल्यावर आपण त्वरित त्यातून बाहेर पडतो. परंतु, स्टॉक्सची किंमत कमी झाल्यास त्यातून बाहेर पडत नाही. तोट्यात असताना स्टॉक्स कसे विकायचे? असा प्रश्न निर्माण होतो. परंतु, यामुळे तुमचे अधिकच नुकसान होण्याची शक्यता असते.
तुम्ही स्वतःला स्टॉप लॉस फॉलो करण्याची सवय लावायला हवी. स्टॉप लॉस फॉलो केल्यास तुमचे नुकसान कमी होईल. तसेच, अनेकजण एखादी कंपनी आवडीचे आहे म्हणून त्याचे शेअर्स विकणे टाळतात. मात्र, कंपनीचे स्टॉक्स चांगली कामगिरी करत नसल्यास वेळेत त्यातून बाहेर पडणे कधीही तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा
तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की पोर्टफोलियोमध्ये विविधता हवी. यामागचे प्रमुख कारण म्हणजे यामुळे नुकसान होण्याची क्षमता कमी होते. तुम्ही स्टॉक्स, बाँड्स, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना स्टॉक्स, म्युच्युअल फंड, ईटीएफमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलियोमध्ये विविधता आणू शकता.
याशिवाय, विविध क्षेत्रातील कंपन्या, लार्ज-मिड कॅपच्या आधारावर स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान टाळू शकता.