Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?

Small-Cap Stocks

Image Source : https://www.freepik.com/

किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. गेल्याकाही महिन्यांमध्ये या स्टॉक्समधून मिळणारा परतावा व शेअर्सच्या किंमतीत होणारी वाढ पाहून यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली जात आहे. एवढेच नाही तर स्मॉल कॅप इंडेक्सने नवीन उच्चांक देखील गाठला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

जास्तीत जास्त परताव्यासोबतच मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता असते. बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे बऱ्याचवेळा केवळ शेअर्सच्या किंमती पाहून खरेदी करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते.

स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे बाजार भांडवलानुसार कंपन्यांचे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे वर्गीकरण केले जाते. ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल हे 5 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते, त्यांचा समावेश स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये होते. बाजार भांडवल हे कंपनीचे बाजारात उपलब्ध असलेले शेअर्स आणि त्यांच्या किंमतीच्या आधारावर काढले जाते. याशिवाय, एनएसई आणि बीएसईकडून जारी केल्या जाणाऱ्या इंडेक्सनुसार देखील कंपन्यांचे वर्गीकरण केले जाते.

स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे का?

निफ्टीच्या तुलनेत स्मॉल कॅप इंडेक्सने उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत 2024 वर्षात स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 25 टक्क्यांनी तर निफ्टीमध्ये 13 टक्क्यांनी वाढली झाली आहे. गेल्यावर्षी स्मॉल कॅप इंडेक्समध्ये तब्बल 68 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळत आहे. असे असले तरीही यात गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते.

आकर्षक परतावा, शेअर्सच्या किंमतीत वाढ, कंपन्यांच्या नफ्यात वाढ यामुळे स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. परंतु, यातील गुंतवणूक ही अस्थिर समजली जाते. बाजारातील अस्थिरच्या काळात या स्टॉक्सच्या किंमती झपाट्याने कमी होतात व गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. स्मॉल कॅप कंपन्यांच्या व्यवसायाबाबतही फार कमी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे यात गुंतवणूक करणे टाळणे कधीही फायद्याचे ठरते.

स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात

बाजारातील ट्रेंडकडे द्या लक्ष गुंतवणूक करताना बाजारातील ट्रेंडकडे नियमित लक्ष द्यायला हवे. बाजारात घसरण सुरू झाल्यास लार्ज कॅपच्या तुलनेत सर्वाधिक फटका हा मिड कॅप व स्मॉल कॅप स्टॉक्सला बसतो. बाजाराच्या घसरणीच्या काळात स्मॉल कॅप स्टॉक्सला वारंवार लोअर सर्किट लागते व अशा स्थितीमध्ये शेअर्सची विक्री करणे शक्य होत नाही.
जोखीम टाळा कमी कालावधी व कमी गुंतवणुकीच्या नादात जास्त परतावा मिळविण्याचा प्रयत्न टाळायला हवा. या स्टॉक्समध्ये वाढीची क्षमता असली तरीही अस्थिरता देखील तेवढीच जास्त असते. जोखीम स्विकारण्याची क्षमता असली तरीही मर्यादित स्वरूपातच यात गुंतवणूक करायला हवी.
म्युच्युअल फंड आणि ईटीएफथेट स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंड व ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबवू शकता. याद्वारे विशिष्ट क्षेत्र, बाजार भांडवल व वाढीची क्षमता याद्वारे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते.
पूर्ण गुंतवणूक करू नकातुमची संपूर्ण गुंतवणूक स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये कधीही करू नये. एकूण गुंतवणुकीच्या केवळ 10 ते 15 टक्के गुंतवणूकच यात करावी. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेच्या काळातही मोठे नुकसान होणार नाही.