Dmart Revenue: किरकोळ व्यवसायातील दिग्गज डी मार्ट कंपनी, जिओ मार्ट आणि बिग बास्केट सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी तयार झाली आहे. यासाठी कंपनीने जूनमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या उत्पादनांवर 20 ते 30 टक्के सूट देण्याची योजना आखली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत देशात ऑनलाइन रिटेल व्यवसायाचा बराच विस्तार झाला आहे. जिओ मार्ट आणि बिग बास्केट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत असतात. अशावेळी इतर कंपन्यांपेक्षा दैनंदिन उत्पादन कमी होत असल्याचा फरक लक्षात घेता डी मार्टने हा निर्णय घेतला आहे.
कंपनीचा तोटा किती?
DMart ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण 1,667 कोटी रुपयांची कमाई केली होती, त्यापैकी कंपनीला एकूण 142 कोटी रुपयांचा तोटा झाला. हा तोटा 2021 च्या तुलनेत अधिक आहे. परंतु, कंपनीने 2023 मध्ये किती तोटा आणि नफा झाला याचे आकडे अजून उघड केलेले नाही. अशा परिस्थितीत कंपनीने आपला तोटा कमी करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्याची तयारीही केली आहे. जून 2023 पासून, कंपनी ग्राहकांना Jio Mart प्रमाणे WhatsApp द्वारे वस्तू ऑर्डर करण्याची सेवा देणार आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
जून महिना अर्धा संपला आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनेक भागांमध्ये शाळा सुरू होतील. यासोबतच मान्सून जुलै महिन्यासह देशात दाखल होणार आहे. या मोसमात पावसात बाहेर जाण्याऐवजी लोक घरच्या घरीच वस्तू मागवण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत अनेक किराणा कंपन्यांना या संधीचा फायदा घ्यायचा असतो आणि त्यांचा मार्केटमधील
पाया मजबूत करायचा असतो. देशामध्ये जिओ मार्ट 200 हून अधिक आणि बिग बास्केट 450 हून अधिक शहरांमध्ये आहेत, तर डी मार्ट केवळ 22 शहरांमध्ये आहे. अशा परिस्थितीत डी मार्ट 20 ते 30 टक्के भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
ऑफरचा ग्राहकांना फायदा
तज्ञांचे मत आहे की,डी मार्ट जुलै ते ऑगस्ट दरम्यान आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी चांगल्या ऑफर देऊ शकते. यासोबतच कंपनी आपल्या ई-प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यावरही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत कंपनीचा व्यवसाय दुप्पट वाढविण्याची योजना आहे.