Dell Layoff: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका बसला आहे. आता निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनाही मंदीची झळ बसू लागली आहे. आघाडीची लॅपटॉप आणि हार्डवेअर उत्पादने तयार करणाऱ्या डेल कंपनीने कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी HP कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. एकूण कामगारांच्या 5% कर्मचारी कपातीचा प्लॅन डेल कंपनीने आखल्याचे वृत्त समोर आले आहे.
डेल कंपनी कर्मचारी कपात (Dell company Layoff)
पर्सनल कॉम्प्युटरची मागणी कमी झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. एकूण 6,650 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल, असे वृत्त ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिले आहे. बाजारपेठ मंदावत असून भविष्यातील चित्रही अस्थिर दिसत आहे, असे कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लर्की यांनी म्हटले आहे. कर्मचारी कपात न करता यापूर्वी कंपनीने पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला. नोकरभरती आणि कंपनीतर्फे दिला जाणारा विमान प्रवास बंद केल्यानंतरही खर्चामध्ये मोठी कपात करता आली नाही. हा पर्याय निष्फळ ठरल्याने आता नोकरकपातीचा निर्णय घेत असल्याचे क्लर्की यांनी सांगितले.
डेल कंपनीचा नफा रोडावला (Dell company revenue)
डेल कंपनीतीली विविध विभागांची पुनर्रचना आणि कर्मचारी कपातीमुळे (Dell Layoff) कंपनीची कार्यक्षमता वाढेल, असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमधील आकडेवारीनुसार कंपनीच्या नफ्यात 6% घट झाली होती. तर चालू तिमाहीत आणखी उत्पन्न रोडावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपन्यांनी लॅपटॉप आणि इतर हार्डवेअर खरेदी केल्याने विक्री रोडावली आहे. मार्चमध्ये चौथ्या तिमाहीचे निकाल हाती आल्यावर कंपनी नोकरकपातीची सविस्तर माहिती देईल, असे कंपनीने म्हटले आहे.
आघाडीच्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात (IT and Tech layoff)
फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 13% म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली आहे. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांत जगभरातील कंपन्यांनी 1 लाख 24 हजार कर्मचारी काढले, तर 2022 मध्ये 1 लाख 53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. कोरोना काळात आयटी कंपन्यांच्या नफ्यात अचानक वाढ झाली होती. मात्र, त्यास उतरती कळा लागली आहे.