डिजिटल क्षेत्राची जशी वाढ होत आहे तसे सायबर सिक्युरिटी नोकऱ्यांमध्येही वाढ होत आहे. सर्व उद्योग व्यवसाय डिजिटल टेक्नॉलॉजीला पसंती देत असल्याने नवनवे सॉफ्टवेअर्स आणि अॅप्लिकेशन बाजारामध्ये येत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांसह विविध प्रकारची माहिती व्यवस्थापित केली जाते. या माहितीला खिंडार पडू नये, डेटा चोरी होऊ नये म्हणून सायबर सुरक्षा एक्सपर्ट रात्रंदिवस काम करतात. सध्या या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
इथिकल हॅकिंग, नेटवर्क सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सेफ्टी एक्सपर्ट यासह अनेक नोकरीच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. फ्रेशर्सच नाही तर करियर बदलू पाहणाऱ्यांसाठीही सायबर सुरक्षा क्षेत्र खुणावत आहे.
2019 ते 2022 या कालावधीत सातत्याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. सुमारे 81% नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. मागील वर्षभरात 25 टक्क्यांनी नोकरीच्या संधी रोडावल्या असल्या तरीही सायबर क्षेत्र करियरचा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.
दरम्यान, कंपन्यांना कर्मचाऱ्यामध्ये जी कौशल्ये हवी आहेत त्यात दरी असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच कंपन्यांना सायबर क्षेत्रातील कामांसाठी कुशल मनुष्यबळ मिळण्यास अडचणी येत आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रातील सर्वाधिक नोकऱ्या बंगळुरू शहरात उपलब्ध आहेत. त्यानंतर दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद शहरातही संधी आहेत.
सिक्युरिटी स्पेशालिस्ट, इंसिडंट रिस्पाँडर, सिक्युरिडी अॅडमिनिस्ट्रेटर, व्हलनरेबिलिटी अॅक्सेसर, क्रिप्टोग्राफर, सिक्युरिटी मॅनेजर, सिक्युरिटी आर्किटेक्ट, फॉरेन्सिक एक्सपर्ट, सिक्युरिटी इंजिनिअर, एथिकल हॅकर, पेनिटरेशन टेस्टर अशा विविध पदांवर नोकर भरती होते. यासाठीची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी बाजारात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील फ्रेशर्सला पॅकेज किती?
अॅम्बिशन बॉक्स या कॉर्पोरेट कंपनी रिव्हू संकेतस्थळावरील माहितीनुसार सायबर सिक्युरिटी क्षेत्रात किमान सरासरी पॅकेज 5 लाख रुपये मिळते. 5 लाख रुपये हे सरासरी पॅकेज असून जास्तीत जास्त 20 लाखांपेक्षाही पॅकेज देणाऱ्या कंपन्या बाजारात आहेत. मात्र, त्यासाठी अनुभव आणि कौशल्ये आवश्यक आहे.
पद, कंपनी आणि जबाबदारीनुसार पॅकेज बदलू शकते. मात्र, फ्रेशर्सला वार्षिक 4 लाखांच्या पुढे पॅकेज मिळू शकते ते जास्तीत जास्त 7-8 लाखांपर्यंतही जाऊ शकते. दरम्यान, या क्षेत्रात येण्यासाठी योग्य कौशल्य नीट आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. अनुभवानुसार पॅकेज वाढत जाते.