आजच्या डिजीटल पेमेंटच्या (digital payment) जमान्यात हे फार होत नाही, पण पूर्वी व्हायचं. मित्रांबरोबर आऊटिंगच्या (Outing) वेळी खिशात किंवा वॉलेटमध्ये पैसे कमी असले की, मित्र-मैत्रिणींना बिल पे करायला सांगितलं जायचं. ऑफकोर्स, आपला हिस्सा (contribution) नंतर देण्याचं आश्वासन देऊनच हे काम पुरं व्हायचं. ही मैत्री खात्यातली सुविधा होती. त्यात फक्त मूळ रक्कम (amount) परत करून काम भागत होतं. शेवटी मित्र याच्यासाठीच तर असतात!
मैत्री खात्यात होती तशाच सुविधा शॉपिंग (shopping) आणि इतर डिजीटल व्यवहारांसाठी (digital transaction) आता दिल्या जात आहेत. ही सुविधा ‘खरेदी आता करा आणि बिल नंतर भरा’ (Buy now pay later -BNPL) या नावाने किंवा फक्त, ‘बिल नंतर भरा’ (pay later) म्हणूनही ओळखली जाते. ही सुविधा वापरायला अत्यंत सोपी आहे. यात डिजीटल माध्यमांचा वापर केला जातो. अगदी कमी वेळेत ही सुविधा वापरता येणं शक्य आहे. तुलनेने लहानसहान पेमेंटसाठीही ती वापरता येतात. त्यामुळे दुकानदार, ग्राहक, वित्तीय संस्था (Finance Organisation) यांच्यात त्याची लोकप्रियता वाढत आहे. शॉपिंग लगेच करायचं आणि पैसे मात्र नंतर काही काळात भरायचे असं त्यांचं स्वरुप आहे. वस्तू, सेवा घेणं किंवा बिलं भरण्यासाठीही अलीकडे ही सुविधा वाढू लागली आहे. याची लोकप्रियता पाहून वेगवेगळ्या कंपन्या यात दिवसेंदिवस अनेक नाविन्यपूर्ण (innovative) सुविधा देऊ करत आहेत. त्यामुळे या प्रकारच्या सुविधांचे स्वरूप सातत्याने बदलत आहे.
कमी रक्कम क्रेडिटवर देणं पूर्वी सोपं नव्हतं. आता डिजीटल व्यवस्थांमुळे तसेच अॅपमुळे अशा सुविधा अनेकांना ऑफर करणं सोयीचं झालं आहे. यामुळे वित्तीय संस्थांना बिझनेसचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. पेमेंट काही काळाने करण्याची सुविधा मिळाली तर ग्राहक (customer) वाढू शकतो, हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे विक्रेते (sellers), विविध सेवा पुरवणारे (service providers) देखील पे लेटर (Pay Later) सारखी सुविधा ठेवण्यावर भर देतात.
अनेक बँका तसेच वित्तीय सेवा कंपन्या या विविध शॉपिंग साईट आणि सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांशी करार करून संयुक्तपणे अशा सुविधा देऊ लागले आहेत. मात्र, अशावेळी ग्राहकांची एक जबाबदारी वाढते. आपण पे लेटरचा व्यवहार नक्की कोणत्या कंपनीसोबत करत आहोत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे तक्रार करण्याची वेळ आलीच तर वेळ वाया न जाता नेमक्या ठिकाणी तक्रार करता येते.
नियम व अटी जाणून घ्या!
कोणतीही ‘पे लेटर’ सुविधा ही ऑनलाईन आहे; ती लगेच कार्यान्वित होते. त्यामुळे वेळ न दवडता लगेच ही सुविधा स्वीकारण्याचा मोह होऊ शकतो. विशेषतः तरुणांना अशा गोष्टी झटपट कराव्याशा वाटू शकतात. मात्र, इथे प्रश्न थेट पैशांशी निगडित असतो. म्हणून आधी योग्य ती सर्व काळजी घेणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी अटी (terms) आणि शर्तींची (conditions) माहिती करून घेणं योग्य असतं. कारण प्रत्येक ठिकाणी त्या वेगवेगळ्या असू शकतात.
मुदत संपल्यावर अतिरिक्त शुल्क लागू
काही सुविधांमध्ये ठराविक काळाच्या मुदतीत पैसे भरले तर अतिरिक्त शुल्क (charges) लागत नाही. मात्र, ती मुदत ओलांडली तर अधिक किती रक्कम भरावी लागते, याची माहिती असणं फायद्याचं असतं. शक्यतो लवकरात लवकर पैसे भरणे ग्राहकांच्या हिताचं असतं. त्यात चालढकल केली किंवा विसरलं गेलं तर त्याचा आर्थिक फटका मोठा असू शकतो.
फसवणुकीपासून सावध राहा
डिजीटल व्यवस्थेत फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अस्सल कंपन्यांसारखे अॅप तयार करून लोकांकडून गोपनीय माहिती मागवण्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. त्यामुळे अशाप्रकारची डिजिटल सुविधा वापरताना ती मान्यताप्राप्त आहे का? याची खात्री करून घेणं आवश्यक आहे.
ही योजना येण्यापूर्वीपासून क्रेडिट कार्ड (Credit Card) अस्तित्वात आहे. क्रेडिट कार्डदेखील खरेदी केल्यानंतर काही काळाने पेमेंट करण्याची सुविधा देते. मात्र या दोन्ही सुविधांमध्ये थोडेफार फरक आहेत.