भाजी असो किंवा नॉनव्हेज पदार्थ कुठलीही असो त्यात जिरे टाकल्याशिवाय आपल्याकडे स्वयंपाक पूर्ण होत नाही. प्रत्येकाच्या किचनमधला अतिशय निकडीचा पदार्थ म्हणजे जिरे. परंतु गेल्या काही दिवसांपासून जिऱ्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे गरीब, सामान्य जनतेला मात्र अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाव घसरले होते, मात्र आता पुन्हा एकदा जिऱ्याचे भाव वेगाने वाढताना दिसत आहेत.नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. आतापर्यंतचा जिऱ्याचा हा सर्वाधिक भाव आहे. मागच्या काही आठवड्यांपूर्वी हा भाव 42,440 रुपये प्रति क्विंटल होता. मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यात 4000 हजारांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
गेल्यावर्षी जिऱ्याला 25,000 च्या आसपास भाव मिळाला होता. आता थेट 46,250 भाव गाठत जिऱ्याने सामान्य जनतेला महागाईचा तडका दिला आहे.
काय आहे कारण?
महाराष्ट्रात जिरे शेती फारच कमी प्रमाणात होते. भारतात गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्येच जिरे शेती केली जाते. ही दोन राज्ये संपूर्ण भारताला जिरे पुरवतात. परंतु अवकाळी पावसाने या राज्यांतील पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे पीक कमी येण्याची चिन्हे आहेत. तसेच जे पीक येईल त्याची गुणवत्ता देखील कमीच असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यापारी मंडळी जिरे साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे जिऱ्याची मागणी वाढली आहे.
90% of india's cumin production is from Gujarat and Rajasthan pic.twitter.com/BqClOYhAD4
— Bharath Legacy (@bharath_legacy) April 18, 2023
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आवक कमी
तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांमध्ये जिऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु तेथे देखील अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. जगभरात जीरा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये उत्पन्न कमी निघत असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत आता भारतीय जिऱ्याची मागणी वाढली आहे. भारतात देखील जिऱ्याचे उत्पन्न कमी निघत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाववाढ होताना दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरअखेर जिऱ्याचे भाव 51,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतात.