येणाऱ्या काळात तुमच्या आमच्या स्वयंपाकघरातील बजेट बिघडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पालेभाज्यांच्या किमती कडाडल्या आहेत. टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्या मुंबई, पुण्यात दुप्पट तिप्पट भावाने विकल्या जात आहेत. आता यात आणखी भर पडली आहे जिऱ्याची! प्रत्येकाच्या घरात जिरे हे वापरलेच जातात. गेल्या काही दिवसांपासून जिऱ्याची आवक कमी झाल्यामुळे त्याचे भाव देखील वाढले आहेत.
देशाच्या अनेक भागांमध्ये आता जिऱ्याची किंमत 700 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. घाऊक बाजारात जिरे 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपयांनी विकले जात आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी भाववाढ आहे. .नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. त्यांनतर आता थेट 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने जिरे विकले जात आहेत.
हे आहे कारण!
महाराष्ट्रात जिरे उत्पादन होत नाही. देशात गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये जिरे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. ही दोन राज्ये संपूर्ण देशाला जिऱ्याचा पुरवठा करतात. मात्र नुकत्याच येऊन गेलेल्या बिपरजॉय वादळाने गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांचे नुकसान केले आहे. याचा थेट परिणाम जिरे शेतीवर पाहायला मिळतो आहे. बिपरजॉय वादळानंतर गुजरात आणि राजस्थानमधून जिऱ्याची आवक चांगलीच कमी झाली असून त्यामुळे भाव वाढले आहेत.
बिपरजॉय वादळापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रासह वेगवगेळ्या राज्यात अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे जिरे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच जे पिक आले त्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम दिसू लागला आहे. मागणी जास्त आणि आवक कमी झाल्यामुळे जिरे महागले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी
भारतापेक्षा तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांमध्ये जिऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जगभरात ही दोन राष्ट्रे मोठ्या प्रमाणात जिऱ्याची निर्यात करतात. या दोन्ही देशांनी देखील यावर्षी अवकाळी पावसाचा सामना केला आहे. या देशांमध्ये देखील जिरे उत्पादन कमी होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. म्हणजेच देशी जिऱ्यासोबत, परदेशी जिरे देखील महागणार आहेत.