इराण आणि इस्त्राईल यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोमवारी 30 जानेवारी 2023 रोजी क्रूडच्या किंमतीत वाढ झाली. इराणमध्ये रविवारी रात्री ड्रोन हल्ले झाल्याने मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. क्रूडचा भाव वधारला आणि तो प्रती बॅरल 87.20 डॉलर इतका झाला आहे.
चीनमधून क्रूडची मागणी वाढली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत तेजी असल्याचे दिसून आले. आज क्रूडचा भाव ५४ सेंट्सने वधारला आणि तो 87.20 डॉलर प्रती बॅरल इतका झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 0.7% ने वधारला आणि तो 80.22 डॉलर इतका झाला.
इराणमधील मिलिटरी फॅक्टरीवर रविवारी ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे इस्त्राईल असल्याचा संशय अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. हा हल्ला नेमका कधी झाला हे सांगता येणे अवघड आहे मात्र यामुळे क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, चीनमधून क्रूडची मागणी वाढली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. चीन अर्थव्यवस्था कोव्हीडमधून सावरत असल्याने क्रूडची मागणी वाढल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ओपेक देशांकडून सध्याचे तेलाचे उत्पादनाचे प्रमाण कायम ठेवण्यात आले आहे.
ओपेक आणि आयईए या दोन्ही संस्थांनी क्रूडच्या मागणीसंदर्भात नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वर्ष 2023 मध्ये क्रूडची मागणी वाढेल, असा अंदाज दोन्ही संस्थांनी वर्तवला आहे. चालू वर्षात जगभरातील क्रूडची मागणी दररोज 1.5 मिलियन बॅरल इतकी वाढेल, असा अंदाज या संस्थानी व्यक्त केला आहे. यात चीनकडून किमान 650000 बॅरल तेल खरेदी केले जाऊ शकते.