वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला. त्याचे पडसाद आज क्रूड ऑइलच्या किंमतीवर उमटले. आज मंगळवारी 3 जानेवारी रोजी कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भाव 1.1% ने कमी झाला. यूएस टेक्सास इंटरमिडिएटमध्ये क्रूडच्या किंमतीत 1% घसरण झाली.
आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की अमेरिका, युरोप आणि चीन हे जागतिक अर्थव्यवस्थेची मुख्य इंजिन्स आहेत मात्र या सर्वांची वृद्धी मंदीच्या प्रभावाने संथ झाली आहे. ज्यामुळे वर्ष 2023 जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संघर्षमय जाईल, असे त्यांनी सांगितले.
आज कमॉडिटी मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल 84.93 डॉलर इतका खाली आला. त्यात 98 सेंट्स किंवा 1.1% घसरण झाली. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 79.49 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. त्यात 1.0% घसरण झाली. आज इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला होता. मात्र शुक्रवारच्या तुलनेत तेलाच्या किंमती अजूनही 2% ने जास्त आहेत.
वर्ष 2022 मध्ये ब्रेंट क्रूडचा भाव 10.5% वाढला. क्रूड ऑइलच्या किंमतीत 6.7% वाढ झाल्याचे दिसून आले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे क्रूडच्या दरात प्रचंड तेजी दिसून आली होती. क्रूडचा भाव प्रति बॅरल 139 डॉलर इतके वाढले होते. डिसेंबर 27 च्या आठवड्यात क्रूडचा पुरवठा 12.3 बिलियन डॉलर्स इतका होता.