Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go First एअरलाइन्सची विमाने पुन्हा आकाशात झेपावणार? 425 कोटी रुपये कर्ज देण्यास बँका तयार

Go First Crises

गो फर्स्ट एअरलाइन्सची सेवा जुलै महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जदारांनी एअरलाइन्सला 425 कोटी रुपये कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, याआधी DGCA कडून विमान कंपनीचे ऑडिट केले जाणार आहे. मे महिन्यापासून गो फर्स्टची विमाने पार्किंगमध्ये धूळ खात पडली आहेत. आर्थिक चणचणीमुळे कंपनीने आपली सेवा बंद केली होती.

Go First Crisis: गो फर्स्ट एअरलाइन्सची विमाने 3 मे पासून पार्किंमध्ये धूळ खात पडली आहेत.  वरवर सर्वकाही ठीक असल्याचे दिसत असताना गो फर्स्टने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. दिवसेंदिवस नफा कमी होत असून आर्थिक अडचणी वाढत असल्याचे कारण देत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता एअरलाइन्सच्या मदतीला गुंतवणूकदार पुन्हा धावून आले आहेत. 425 कोटी रुपये देण्यास कर्जदार तयार झाले आहेत. (Creditors ready to finance Go First) त्यामुळे गो फर्स्टची विमाने लवकरच आकाशात झेपावतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पायलटसह कर्मचाऱ्यांचे राजीनामा सत्र

दिवाळखोरीचा अर्ज दाखल केल्यानंतर कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंपनीच्या मालकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, एअरलाइन्स अडचणीत असल्याचे पाहून पायलट आणि इतरही कर्मचाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता पुन्हा एअरलाइन्स सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँक या गो फर्स्ट एअरलाइन्सच्या कर्जदार आहेत. 425 कोटी रुपये देण्यास बँका तयार झाल्या असून संचालक मंडळाची परवानगी बाकी आहे.

जुलै महिन्यात पुन्हा विमाने आकाशात झेपावणार 

चालू महिन्यापासून विमान सेवा पुन्हा सुरळीत करण्याचे नियोजन गो फर्स्टने आखले आहे. मात्र, अद्याप यास वेळ आहे. 22 विमानांद्वारे 78 फ्लाइट्स दरदिवशी सुरू करण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, आता ग्राहकांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी कंपनीला तिकिटावर मोठा डिस्काउंट द्यावा लागू शकतो. कारण, अचानक विमान सेवा बंद केल्याने ग्राहकांचे पैसे अडकून पडले होते. तसेच आरक्षित तिकिट रद्द झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. तिकीट एजंटचेही पैसे अडकून पडले होते.

गो फर्स्ट एअरलाइन्सवर बँकांचे 6,521 कोटींचे कर्ज आहे. हे फेडण्यास एअरलाइन्स सध्या सक्षम नाही. त्यात आता आणखी 425 कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे गो फर्स्टसाठी येणारा काळ कठीण असेल. नफा कमावण्याबरोबरच पैशांचा जपून वापर करावा लागेल. अन्यथा पुन्हा कंपनी संकटात येऊ शकते.

डीजीसीआय करणार गो फर्स्टचे ऑडिट

देशात पहिल्यांदाच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) एखाद्या एअरलाइन्सचे ऑडिट करणार आहे. (DGCA audit GO First) एअरलाइन्स पुन्हा उड्डाणासाठी सज्ज आहे की नाही हे ऑडिटद्वारे तपासले जाईल. 3 मे पासून विमानसेवा बंद आहेत. तसेच अनेक पायलट आणि कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनी पुन्हा उड्डाणास सज्ज आहे की नाही, हे तपासले जाईल.

दिवाळखोरीसाठी इंजिन पुरवठादार कंपनी जबाबदार

गो फर्स्ट एअरलाइन्सने pratt and whitney या कंपनीकडे विमानाच्या इंजिनची ऑर्डर दिली आहे. मात्र, या अमेरिकन इंजिन तयार करणाऱ्या कंपनीने गो फर्स्टला वेळेत इंजिनचा पुरवठा केला नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सिझनमध्ये प्रवाशांची संख्या सर्वाधिक असतानाही नव्याने फ्लाइट सुरू करता आल्या नाहीत, असे गो फर्स्टने म्हटले होते. दिवाळखोरीसाठी pratt and whitney कंपनी जबाबदार असल्याचे गो फर्स्टने म्हटले होते. दरम्यान, सुट्ट्यांचा सिझन संपल्यानंतर गो फर्स्टची विमानसेवा सुरू होत असल्याने कंपनीला किती ग्राहक मिळतात, हे लवकरच समजेल.