Adhik Maas 2023 : 18 जुलैपासून अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये लग्नकार्य आणि आणखी काही विधी करू नये असं म्हणतात. त्यामुळे कपडा मार्केट, भांड्यांचे मार्केट यावर परिणाम होतो. पण त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सोने, चांदी, पितळ, तांबे या धातूची विक्री वाढते. अधिक मासमध्ये मुलीला आणि जावयाला या चार धातू पैकी एका धातूचे कोणतेही भांडे वाण म्हणून दिले जाते.
मान्यतेप्रमाणे या मागचे कारण हेच की मुलगी आणि जावई म्हणजे लक्ष्मी नारायणचा जोडा असतो, आणि अधिक मास हा भगवान विष्णूच्या पूजेचा महिना मानला जातो. म्हणून त्यांना वाण दिले जाते. तर जाणून घेऊया तांब्याचे भांडे महागणार का? त्याची मागणी किती?
काळानुसार अनेक पद्धतीमध्ये बदल घडून आले. तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये जावयाला वाण देण्यासाठी जास्तीत जास्त तांबे वापरले जात आहे. त्याचबरोबर कपडेही दिले जातात. सध्या मार्केटमध्ये तांब्याचे ताम्हण, आकर्षक दिवे, नंदादीप, तबक, तांब्या, घागर, नक्षीदार ताम्हण आहे. त्यात तांब्याचे ताम्हण 200 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत मिळते.
तांब्याच्या भांड्याचे दर
तांब्याचे दिवे | 20 रुपये | 12 नग (लहान) |
तांब्याचे दिवे | 120 रुपये | 12 नग (मध्यम) |
ताम्हण | 80 ते 250 रुपये | प्रतिनग (आकारमानानुसार) |
तांब्या | 60 ते 250 | प्रतिनग |
निरांजन | 20 ते 80 रुपये | प्रतिनग |
नंदादीप | 60 ते 200 रुपये | प्रतिनग |
पाच तांब्यांच्या भांड्यांचा सेट | 500 ते 550 | 5 भांडे |
तांब्याच्या दरात 10% वाढ
अधिक मासमध्ये दिपदानाला सर्वाधिक महत्व दिले जाते. बाजारात अनेक प्रकारच्या डिझाईन उपलब्ध झाल्या आहेत. अधिक मास सुरू झाल्यापासून तांब्याच्या भांड्यांची मागणी वाढली आहे, असे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील विक्रेत्यांनी सांगितले. तांब्याच्या किमतीमध्ये 1 किलोमागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या तांब्याचे दर हे 786.30 रुपये किलो असे आहे. त्याचबरोबर सोने, चांदी, पितळ याच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. पण तांब्याच्या तुलनेत ती वाढ कमी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कपड्यांच्या मागणीतही वाढ
वाण देण्याबरोबरच मुलीला आणि जावयाला नवीन कपडे सुद्धा देण्याची प्रथा अधिक मासमध्ये आहे. सध्या रेडिमेड कपड्यांकडे सगळ्यांचा कल वाढला आहे. लग्नसराई नंतर आता पुन्हा कपड्यांच्या मागणीत वाढ झाल्याची बातमी व्यापऱ्यांकडून मिळाली आहे. लग्न झाल्यानंतर आलेला पहिला अधिक मास म्हणून अनेक प्रकारची खरेदी केली जाते. मार्केटमध्ये सध्या अधिक मासच्या खरेदीची गर्दी जास्त दिसून येत आहे.