स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरु झालेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' या परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासह रविवारी मध्यरात्री रवाना झाले. या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक गुंतवणूक करार होणार आहेत.
दावोसमध्ये 15 ते 19 जानेवारी 2023 या दरम्यान 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र रविवारी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे दावोससाठी रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री दोन दिवस उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, एमआयटीआरएचे अध्यक्ष अजय अशर आणि अधिकारी आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे यापूर्वीच स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे पोहोचले आहेत.
दावोसमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा 15 ते 19 जानेवारी असा दावोसचा दौरा ठरला होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारी रोजी मुंबई दौरा ठरल्याने दावोस दौऱ्याचा कार्यक्रम दोन दिवसांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दावोसला पोहोचणार असून मंगळवारी संध्याकाळी मायदेशी परतण्यासाठी निघणार आहेत.
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे निवडक देशांच्या पंतप्रधानांशी आणि उप पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक केंद्र आहे. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 420 बिलियन डॉलर इतकी आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा 14.2% वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात राज्याचा 15% वाटा आहे. राज्यात 44 विशेष आर्थिक क्षेत्र असून 5 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत विमानतळे आहेत. दोन मोठी आणि 53 छोटी बंदरे आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आणणार 1.4 लाख कोंटींची गुंतवणूक
दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्रात जवळपास 1.4 लाख कोटींची थेट गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जवळपास 20 गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. यात 1.2 लाख कोटी ते 1.4 लाख कोटी या दरम्यान करार होण्याची शक्यता आहे. वर्ष 2022 मध्ये दावोसमध्ये पार पडलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्राने 80000 कोटींचे सामंजस्य करार केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातच थांबले
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी 2023 रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिकेचा शुभारंभ होणार आहे. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला न जाता राज्यात थांबले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव देखील पंतप्रधानांच्या मुंबई भेटीचे नियोजन करण्यासाठी दावोसचा दौरा टाळल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.