गेल्या काही दिवसांपासून GoFirst एयरलाईन्सबद्दल सातत्याने माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत. दिवाळखोरीत निघालेल्या गोफर्स्टने सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच उड्डाणे रद्द झाल्यामुळे ग्राहकांना पैसे परत मिळवताना देखील मनस्ताप सहन करावा लागत होता.
अशातच इतर विमान कंपन्यांनी विमानप्रवास भाडे वाढवल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ऐन सुट्ट्यांच्या काळात भाडेवाढीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्व विमान कंपन्यांना एक महत्वाचा इशारा दिला आहे. कंपन्यांनी त्यांचे प्रवास भाडे नियंत्रणात ठेवावे आणि प्रवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना कळवले आहे. तशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
GoFirst ची दिवाळखोरी इतरांना फायद्याची
रोखीच्या तुटवड्यानंतर GoFirst ने 3 मे पासून त्यांची सर्व उड्डाणे बंद केली आहेत. ज्या मार्गांवर गो फर्स्टची उड्डाणे होती त्या सर्व मार्गावरील भाडे आता वाढले आहे. याचा थेट फायदा इतर स्पर्धक कंपन्या घेताना दिसत आहेत. दिल्ली ते पुणे हा प्रवास आधी 3-4 हजारांमध्ये होत होता. त्याच प्रवासासाठी ग्राहकांना आता 5-6 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
मुंबई ते दिल्ली हा प्रवास देखील महागला असून 4 हजारांच्या प्रवासाला आता ग्राहकांना सुमारे 7 हजार रुपये मोजावे लागत आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून अनेक लोक देशांतर्गत प्रवास करत आहेत. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवासखर्च वाढल्याने ग्राहकांनी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रारी नोंदवलेल्या होत्या. तसेच अनेकांनी सोशल मिडीयावर देखील याबद्दल लिहून नाराजी व्यक्त केली होती.
भाडे नियंत्रित करण्याची योजना नाही
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की विमान भाडे नियंत्रित किंवा नियमन करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. परंतु सामान्य नागरिकांना वाढत्या प्रवासखर्चाचा त्रास होऊ नये याची काळजी विमान कंपन्यांनी देखील घेतली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशांतर्गत विमान कंपन्यांनी एप्रिलमध्ये 128.88 लाख प्रवाशांची प्रवास केला होता.